पान:विचार सौंदर्य.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें

७१

असतें असें विकासवादावरून आपणांस कळतें व हाच न्याय वाङ्मयनिर्मितीलाहि लागू पडतो. आपण आजकाल ज्याला वाङ्मय म्हणतों तें बुद्धिपूर्वक निर्माण केलेलें, निश्चित स्वरूपाचें, विशिष्ट ध्येयगर्भित असलेलें, सौंदर्यदृष्ट्या संस्कार दिले गेलेलें, असें असतें. सहजगत्या, स्वयंप्रवृत्तीनें, तात्कालिक स्फूर्तीनें निर्माण झालेलें संस्कारविहीन वाङ्मय हें वाङ्मय म्हणावयाचें झाल्यास वर निर्दिष्ट केलेल्या मूलभूत व अबुद्धिपुरस्सर स्वरूपाचें तें असेल !

 स्फूर्तिवादी कवि किंवा टीकाकार ह्यांना हें म्हणणें प्रथम-दर्शनीं पटणार नाहीं. प्रतिभेचें महत्त्व मी कभी करतो आहे असे ते मला म्हणतील. भावनेच्या उद्रेकाला मी महत्त्व देत नाहीं असा आक्षेप दुसरे कांहीं घेतील. त्यांपैकी कांहींजण जे इंग्रजी शिकलेले असतील ते ' Poetry is the spontaneous overflow of powerful feelings ' या वर्ड्स्वर्थ कवीच्या वचनाची आठवण देतील. संस्कृत वाङ्मयाशी परिचित असलेले कांहींजण बाल्मीकीनें एका काममोहित क्रौंच-मिथुनाला एका निषादानें मारलेले पाहून त्याच्या तोंडून सहजगत्या कोपाच्या आवेशांत निघालेल्या

 मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

 यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥

या श्लोकाची आठवण करून देतील. हा श्लोक वाल्मीकीच्या तोंडून साहजिकपणेंच चित्तक्षोभामुळे बाहेर पडला असेल हें मी कबूल करतों. अनुष्टुप्छंदाची कल्पना सुदैवानें सुचलेल्या या श्लोकावरून वात्मीकीला आली असेल हेंहि मी कबूल करतों; परंतु सबंध रामायण अशा तात्कालिक विकारवशतेमुळे किंवा क्षोभामुळे झाले असेल हैं मला संभवनीय वाटत नाहीं. रामायण रचतांना वाल्मीकीचें मन प्रक्षुब्ध नव्हतें, विकाराधीन नव्हतें. त्याचें मन शान्त, प्रसन्न, आनंदयुक्त होतें व म्हणूनच त्याच्या हातून शान्ति देणारी, प्रसादयुक्त व आनंददायक अशी वाङ्मयनिर्मिति झाली. वर्डस्वर्थनें 'Poetry is the spontaneous overflow of powerful feelings' असें जें म्हटले आहे त्याच्यापुढेंच 'taking its origin from emotion recollected in tranquillity' अशा प्रकारची पुष्टि त्या वचनाला तो जोडतो हैं पुष्कळ लोक विसरतात. मनोविकार क्षोभ पावले असतां कांहीं वाक्यें किंवा एखाद-दुसरा चरण