पान:विचार सौंदर्य.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७० 

विचार सौंदर्य

अमुक करूं नको असें त्याला सुचविलें; हें फूल किंवा हा चंद्र (किंवा दुसरी एखादी सुंदर वस्तु ) किती सुंदर आहे पाहा असे सांगितले; त्याचप्रमाणे त्या आईनें किंवा त्या मुलाच्या बापानें किंवा सवंगड्यांनी त्याच्याशीं अमुक चांगले कां किंवा वाईट कां, यांत सौंदर्य कोठे आहे किंवा सौंदर्यहानि कोठें झाली आहे, अशा आशयाची चर्चा केली, त्या समाजांत जर आपणांस कल्पनेनें जातां आलें तर वाङ्मयाच्या इतर बहुतेक अंगांचीं अगदी मूलभूत स्वरूपे आपणांस पाहण्यास मिळतील.

 अशाच पद्धतीने व कल्पनेच्या सहाय्यानें वाङ्मयाच्या निरनिराळ्या अंगांचीं पूर्णतेप्रत गेलेलीं अंतिम, शुद्धतम व उच्चतम स्वरूपें डोळ्यांपुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला तर आपणाला असे देखावे दिसतील:- तें पूर्णविकसित वाङ्मय वाचीत असतांना त्या त्या विषयासंबंधानें आपणांस पूर्ण व सर्वांगीण सत्य कळत आहे असें वाटेल व सर्व शंकांचे समाधान होऊन

भिद्यते हृदयग्रंथिच्छिद्यन्ते सर्वसंशयाः ।


अशी आपली स्थिति होईल. तें अंतिमावस्थेतील उच्चतम वाङ्मय वाचतांना आपल्या सात्त्विकतम मनोवृत्ति जागृत होतील व मनोद्वैध आणि अंतःकलह पूर्णपणें मिटून ब्रह्मानंदाचा ज्याला सहोदर म्हणतां येईल अशा प्रकारच्या अलौकिक आनंदाचा आपणांस लाभ होईल. अशा प्रकारच्या वाङ्मयांत ज्ञानाची प्रसन्नता, तपाचें तेज, कर्तृत्वाचा आत्मप्रत्यय, पावित्र्याची कान्ति, प्रेमाचें स्मित व कलेचा विलास या सर्वांचा उत्कर्ष दिसून येईल. वाङ्मयाचें अगदी आरंभींचें मघाशीं वर्णन केलेले स्वरूप व आतां वर्णिलेले हैं पूर्णावस्थेतील स्वरूप, या दोन टोकांमध्ये कोठें तरी तुमच्या आमच्या वाङ्मयाचें स्थान आहे.

 या स्थानाचा विचार करण्यापूर्वी वाङ्मयाच्या आद्यतम स्थितीकडे पुन्हां एकदां क्षणभरच वळू या ! वाङ्मय निर्माण करावयाचें, हा हेतु डोळ्यांपुढें स्पष्ट ठेवून आपल्या आद्य पूर्वजांनीं वाङ्मय निर्माण केलें नाहीं; तें अबुद्धिपुरस्सर होत होतें. त्याचें स्वरूप अस्पष्ट होतें. तें तुटक तुटक होतें. निरनिराळ्या अवयवांमध्यें निकट असा अन्योन्यसंबंध नव्हता. त्याला निश्चित नाम किंवा रूप नव्हतें. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे तें वाङ्मय प्रवाही स्वरूपाचें होतें. लहानमोठ्या वनस्पतींचें, प्राण्यांचें, संस्थांचें, शास्त्रांचें किंवा कलांचें असेंच मूळ स्वरूप