पान:विचार सौंदर्य.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयाची प्रवृत्ति व त्याचीं ध्येयें


 प्रथम वाङ्मयाची आद्यप्रवृत्ति कशी झाली तें पाहूं. याचा विचार करतांना माझ्या मतें वाङ्मयाचे (१) अबुद्धिपुरस्सर किंवा अबोधपूर्व वाङ्मय, व (२) बुद्धिपुरस्सर किंवा बोधपूर्व वाङ्मय, असे दोन वर्ग कल्पिणें उपयुक्त होईल. मानवी वाङ्मयाचें जें एक अंग आहे त्याच्याद्वारें हरतऱ्हेच्या मानवी प्रेरणा, अपेक्षा, वासना व आर्तत्व यांना वाचा फुटते हैं जर खरें असेल तर मानवजातींतील अगदर्दी पहिल्या अपत्यानें जन्माला आल्याबरोबर काय पाहिजे आहे, काय नको आहे, याची जाणीव नसतांना केवळ आर्तत्व व्यक्त करणारा जो करुण स्वर काढला त्या वेळेस त्यानें नकळत, अहेतु- पुरस्सर व संस्काराचा अत्यंत अभाव आहे अशा रीतीनें वाङ्मयनिर्मितीला आरंभ केला असे म्हटले पाहिजे. वाङ्मयाच्या द्वारें कित्येक वेळां आपण सृष्टीतील इंद्रियगम्य व इंद्रियांना अगम्य अशीं दृश्यें व चमत्कार पाहून—

 आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्य:

 आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ||

 या न्यायानें आपलें आश्चर्य व्यक्त करतों, हरतऱ्हेचे परिप्रश्न विचारतों, अर्जुनाप्रमाणे किंवा नचिकेताप्रमाणें हरतऱ्हेच्या शंका विचारतों, हें जर खरें असेल तर ज्या पहिल्या मानवी अपत्याने आपल्या अर्धस्फुट वाचेच्या द्वारें आश्चर्य व्यक्त केलें, प्रश्न केले किंवा शंका विचारल्या, त्यानें अजाणतां वाङ्मयोद्यानांतील एक रोपटें लावले असे म्हटले पाहिजे. याच रीतीनें पाहिले असतां रानटी स्थितींतील ज्या मानवी समाजांत पहिल्या प्रथम प्रश्नांची किंवा शंकांची उत्तरे दिलीं; पहिल्याप्रथम आईनें रडणाऱ्या मुलाला सहज सुचलेल्या किंवा अल्पप्रयत्नानें जुळविलेल्या अनुप्रसंगांनी युक्त अशा शब्दांनीं उगी केलें; कांहीं अंशीं तालबद्ध असलेल्या अंगाई-गीतांच्या चरणांनीं त्याला मांडीवर निजविण्याचा प्रयत्न केला; अमुक कर किंवा