पान:विचार सौंदर्य.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

६७


प्रयोग त्यांनी अनेक ठिकाणी वापरले आहेत ते प्रथमदर्शनीं हरदासी थाटाचे वाटतात,पण ही प्रथा सुरू झाली तर मराठीच्या सोइस्करतेंत आणि सामर्थ्यात भर पडेल असे वाटतें. ती प्रथा लोकप्रिय करण्याचा धाडसी प्रयत्न यशस्वी होण्यास कालावधि लागेल, पण जेव्हां तो होईल तेव्हां यशस्वीतेचें थोडेंसें तरी श्रेय केतकरांकडे जाईल. कथानकाचीं पात्रें निवडण्यांतहि त्यांनीं धाडस व कल्पकता दाखविलेली आहे. वेश्यांच्या मुलींना कथानकांत गोवण्याचें काम अलीकडील पुष्कळच लेखकांनी केलेले आहे; पण हें काम करणाऱ्याला जी माहिती, जी विचारप्रवणता व जी व्यापक दृष्टि लागते तिचा अभाव बहुतेक ठिकाणी दिसून येतो. केतकरांच्या कादंब-यांमध्यें गरीब मजुरांच्या परिस्थितीचा व त्यांच्या प्रश्नांचा फारसा विचार केलेला नाहीं, ही कांहींना उणीव भासेल. अलीकडच्या कांहीं 'भाई' लोकांना समाजशास्त्राचें खोल ज्ञान नाहीं, असें केतकरांचें मत होतें असें त्यांच्या कादंबऱ्यांतील कांहीं उल्लेखांवरून दिसून येतें. मजुरांचा प्रश्न सोडविण्याचे 'भाई'चे मार्ग चुकीचे आहेत असे सांगून न थांबतां खरे मार्ग केतकरांनीं सोदाहरण दाखविले असते तर बरें झालें असतें. पण त्यांना तेवढें आयुष्य लाभलें नाहीं. दुसरी गोष्ट अशी की, प्रत्येक कादंबरी - कारानें हे प्रश्न हातीं घेतलेच पाहिजेत हा केवळ दुराग्रह होय. ज्यानें जे प्रश्न हाती घेतले ते त्यानें कसे सोडविले आहेत एवढे आपण पाहावें आणि गुणदोषचर्चा करावी त्यांत औचित्य आहे. 'कलात्मकते'च्या नांवावर विचारशून्यता लपविण्यापेक्षां कलात्मकतेकडे थोडेंसें दुर्लक्ष करून संसारांतील विविध दृश्यें जीं सामान्य लोकांच्या नजरेला आलीं तीं दाखविणें, त्यांतील खोल मर्म सुचविणें, त्यांच्या दर्शनानें सुविचारांत, सद्भावनेंत आणि सात्त्विक आनंदांत भर घालणें, हें अधिक श्रेयस्कर आहे. हें कार्य करतांना भाषेची ठाकठिकी साधली नाहीं, कथानकाची बांधणी शिथिल आणि मांडणी अव्यवस्थित झाली, कांहीं ठिकाणीं अकालपांडित्य-प्रदर्शन झालें व कांहीं ठिकाणी कंटाळवाणा पाल्हाळ झाला, तर हे दोष दोषस्वरूपच आहेत; परंतु ते पत्करतील. 'कले' चें नांव एकसारखें घेऊन विचारशून्य उखाणे घेत बसणाऱ्यापेक्षा वरील दोष करून विचारप्रवर्तक व सद्भावना- पोषण करणाऱ्या केतकरांमध्ये उच्चतर दृष्ट्या कलात्मकता अधिक आहे असें