पान:विचार सौंदर्य.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ 

विचार सौंदर्य


आमूलाग्र व संपूर्ण छाननी होणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट जातीचा किंवा वर्गाचा किंवा धर्माचा विचार करून हिंदुस्थानचा प्रश्न सुटणार नाहीं हा सिद्धान्त बाजूला ठेविला आणि कादंबरीकारानें स्वभाव- वर्णन व प्रसंगवर्णन एवढेंच आकुंचित ध्येय डोळ्यांपुढे ठेविलें तरी देखील स्वभावांचें व प्रसंगांचें रहस्य कळण्यास सामाजिक परिस्थितीची किती छाननी करावी लागते, मनःसागरांत किती खोल बुडी मारावी लागते, आणि या मानसशास्त्रीय पाणबुड्यानें आपले मन किती उदार, ज्ञानसंपन्न, निर्विकार व निर्भय ठेवावें लागतें, हें केतकरांच्या कादंबऱ्यांतून जसें स्पष्ट होतें तसें इतर कादंबऱ्यांतून होत नाहीं, हे कोणालाहि मान्य करावें लागेल.

  [ ३ ] कादंबऱ्या ज्या लिहावयाच्या त्या जीवनविस्मृतीकरितां 'for escape from life' कीं जीवनोन्नतीकरितां या वादांत येथें शिरण्याचें कारण नाहीं. कांहीं कादंबऱ्या वर्तमान जीवनाची विस्मृति पडावी आणि काल्पनिक जीवनांत मन रममाण व्हावें एवढ्याकरितां प्राधान्येंकरून लिहिलेल्या असतात आणि तशाच हेतूनें त्या वाचल्याहि जातात हें खरें आहे; आणि त्यांत वावगें असें कांहीं नाहीं. पण कांहीं कादंबऱ्या वर्तमानाची विस्मृति उत्पन्न करून जीवनाचा खरा व खोल अर्थ सुचवितात, आत्मोन्नतीच्या व समाजोन्नतीच्या मार्गाचें दिग्दर्शन करून त्या मार्गाने जाण्याबद्दल आवड व उत्साह उत्पन्न करितात, हेंहि खरें आहे. आनंद- दानाचें कलेचें कार्य साधून हें दुसरें कार्य साधलें तर त्यांतहि वावगें असें कांहीं नाहीं. केतकरांच्या कादंबऱ्यांमध्ये कांहीं कलातत्त्वांकडे दुर्लक्ष झालें आहे यांत शंका नाहीं. त्यांनीं या बाबतींत थोडें अधिक लक्ष दिलें असतें तर विचारप्रवर्तक व उदार भावनांचें पोषण या दृष्टीने त्यांच्या कादंबऱ्यांची जी योग्यता आहे ती अनेक पटींनी वाढली असती. आहे त्या स्थितींत देखील त्यांचें कार्य डोळ्यांत भरण्यासारखे आहे. त्यांची भाषाच घेतली तर ती रुक्ष व खडबडीत आहे असे आपण म्हणतों, पण तींतहि त्यांचें धाडस आणि विचारप्रवर्तकत्व दिसून येतें. 'सदाशिवपेठी ' 'परीक्षा-मोजू' (वृत्ति ), 'बाहेर जाव' (walk-out) इत्यादि शब्द असंस्कृत वाटतील, पण ते परिणामकारक आहेत. 'करती झाली ','विचारते झाले' इत्यादि सकर्मक क्रियापदांचे भूतकाळाचे कर्तरि