पान:विचार सौंदर्य.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

६५


तिला कांहींसें अंतर्मुख करून किंचित् गंभीर स्वरूपाच्या अंतःकलहाकडे मधून मधून लक्ष देण्याचा थोडासा नाद लाविला. प्रो.फडक्यांनी तिची सुशिक्षित श्रीमंतांशी ओळख करून देऊन सुसंस्कृत प्रेमलीला तिला शिकविल्या आणि त्यांनी तिची कलादृष्टि विशेष जागरूक व आग्रही केल्यानें कलानैपुण्यामुळे उत्पन्न होणारी 'जादूगिरी' तिच्या डोळ्यांमध्ये चमकूं लागली. खांडेकरांनीं उपमा-उत्प्रेक्षादि अलंकारांनी तिला सजविली, पण अलंकारोन्मत्त न करतां तिला जीवनाकडे केवळ क्रीडादृष्टीनेंच नव्हे, तर हळुवार चित्तानें पाहण्याची संवय लावली. ना. ह. आपटे यांनी तिला संसारविषयक सदुपदेशाचे पाठ दिले.'विभावरी शिरूरकर' नें तिला लालित्ययुक्त औद्धत्याभास मधून मधून आकर्षक होतो हैं एक विलोभन- तत्त्व शिकविलें. अशा रीतीनें अनेकांनीं- प्रौढतरुणांनीं-स्त्रीपुरुषांनीं- कादंबरीच्या वाढत्या वयाला अनुसरून तिचें जीवन सुविनित व कलापूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. केतकरांनी १९२६ मध्यें या क्षेत्रांत प्रवेश करून तिला हरतऱ्हेचे वेष-देश दाखविले, आणि बऱ्या-वाईट रूढ कल्पनांचें, विचारांचें व भावनांचें अंतरंग सर्वात अधिक सूक्ष्मतेनें व व्यापक दृष्टीने ओळखण्यास शिकविलें. समाजांत निरनिराळ्या जाति व धर्म, चालीरीति व रूढ कल्पना, प्रवृत्ति व आकांक्षा असल्यामुळे संमिश्र स्वरूपाचे प्रश्न कसे उत्पन्न होतात व ते सोडविण्याचे भांडारकर,आगरकर प्रभृतींचे प्रयत्न कितीहि सद्धेतुयुक्त असले तरी ते कसे अपुरे आणि (त्यांच्या मतानें अशास्त्रीय) आहेत, हेंहि त्यांनीं सोदाहरण दाखवून दिलें. केतकरांच्या पूर्वी समाजाच्या विविध आणि संमिश्र स्वरूपाच्या अंतरंगाचें इतक्या व्यापक दृष्टीनें कोणी फारसें निरीक्षण केले नव्हतें; आणि निरीक्षण करून जीं अनुमानें निघतील तीं इतक्या धैर्याने आणि निर्भीडपणानें सांगणारे तर फारच थोडे. धर्माचा आणि विवाहाचा कांहीं संबंध नाहीं, रखेली ठेवणें हेंहि कित्येक वेळां समर्थनीय ठरतें, कलानिपुण स्त्रियांना प्रचलित विवाहबंधनें लागूं नसावीत, तरुण-तरुणींनीं प्रेमसंशोधनाच्या किंवा प्रेमदर्शनाच्या बाबतीत संकोच किंवा भिडस्तपणा बाळगूं नये, अशा प्रकारची मतें समर्थनीय असोत किंवा नसोत, तीं निर्भयपणे समाजापुढे मांडणें हे काम कोणी तरी करावयासच पाहिजे होतें; त्याशिवाय त्यांची

 वि सौं. ...५