पान:विचार सौंदर्य.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४ 

विचार सौंदर्य


यहुदी, शीख, ख्रिश्चन लोकांत आपणांला नेतात; नायकिणी, रखेल्या व त्यांच्या मुली यांच्याकडे नेण्यास कचरत नाहींत; इंग्लंडांत गेलेल्या विद्यार्थ्यांचे विनोदी संवाद आपणांस ऐकवितात; तिकडे गेलेल्या अर्धवट स्थायिक झालेल्या बंगाली वगैरे प्रौढ स्त्रियांचें अंतरंग आपणांस दाखवितात; तेथील तरुणींच्या हृदयांतील अंतःप्रेरणा व अंतःकरण याबद्दल सहानुभूति उत्पन्न करितात; अमेरिकेंत गेलेल्या नव्याजुन्या हिंदी स्त्रीपुरुषांचीं ध्येयें व त्यांच्या विचारसरणी यांतील भेद स्पष्ट करून दाखवितात. तेथील हिंदी राजकारणांतील सौम्य काँग्रेसपक्षीय व ज्वलजहाल 'गदर' पक्षीय लोकांची मनोवृत्ति समजावून देतात; इंग्लंडांतील व अमेरिकेंतील परिस्थिति पाहून प्रत्यक्ष आलेल्या विचारवन्त 'बुवा 'शीं ओळख करून देतात - ही यादी लांबविण्यांत अर्थ नाहीं; तात्पर्यार्थ वाचकांना कळलाच आहे. केतकरांच्या कादंब-यांनीं पात्रांची क्षेत्रव्याति व विविधता यांत वृद्धि केली, यावर विशेष भर द्यावेसे मला वाटत नाहीं. केतकरांनीं जी मराठी कादंबऱ्यांत भर घातली आहे, ती ' सदाशिवपेठी ' वृत्ति व दृष्टि सोडून त्यांत जें नावीन्य आणिलें त्यांत आहे. 'सदाशिवपेठी ' समाजाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या आकांक्षा, त्यांचीं ध्येयें यांतच गुरफटलेल्या मराठी कादंबरीवाङ्मयाला महाराष्ट्रांतील मध्यमवर्ग म्हणजे महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थान नव्हे; बालविवाह, पुनर्विवाह, तरुण-तरुणी-विवाह, जातिभेद, इंग्रजांचा जुलूम इत्यादि प्रश्न हेच सध्यांच्या पिढीनें सोडविण्याचे प्रश्न नव्हेत; रूढ नीति किंवा सुशिक्षित समाजाने इंग्रजी वाङ्मयावरून घेतलेली नीति म्हणजेच त्रिकालाबाधित व सर्व समाजाला सारखी लागू पडणारी नीति नव्हे; समाजाचा विचार करावयाचा म्हणजे सर्व प्रवृत्तींचा विचार करावा लागतो. केवळ शिष्टसंमत प्रवृत्तींचाच विचार करून चालत नाहीं; इत्यादि अनेक गोष्टी त्यांच्या कादंबऱ्यांवरून जशा प्रतीत होतात तशा तत्पूर्व कादंबऱ्यांवरून होत नाहींत हें कोणीहि कबूल करील.

  [ २ ] हरिभाऊ आपट्यांनी मराठी कादंबरीला अद्भुततेच्या बालोचित कल्पनाविहारापासून परावृत्त करून वास्तवतेच्या भूमिकेवर आणून तेथील रमणीय,चिंतनीय व लक्षणीय दृश्यांचा तिला नाद लाविला, आणि तिच्या क्रीडेला व्यवस्थित, कलायुक्त व विचारगर्भ स्वरूप दिलें. नंतर 'रागिणी'नें