पान:विचार सौंदर्य.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

६३


सुशिक्षित समाजाला आपल्या नीति-अनीतिविषयक कल्पनांचा आणि भावनांचा फेरविचार करण्यास लाविलें, ही त्यांची एक मोठीच कामगिरी आहे. रूढ कल्पना व भावना म्हणजेच सत्कल्पना व सद्भावना असे नव्हे, हे त्याच्या लोकविलक्षण परंतु प्रेमार्ह व आदरार्ह नायक-नायिकांशीं परिचय झाल्यानंतर कोणाहि रसिकाला पटल्याशिवाय राहणार नाहीं.

 केतकरांच्या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीवाङ्मयांत एकंदर कोणती भर घातली याचा विचार करूं लागल्यावर दोन-तीन गोष्टी ध्यानांत येतात त्या अशाः-- ( १ ) त्यांच्यापूर्वीच्या कादंबऱ्या बव्हंशीं ' सदाशिव पेठी ' होत्या आणि त्यांनी त्यांचें क्षेत्र विस्तृत केलें. ( २ ) त्यांच्या कादंबऱ्यांमध्यें मनुष्यस्वभावावर व वर्तनावर सभोवतालच्या परिस्थितीचा व सामाजिक रचनेचा सूक्ष्म पण अत्यंत प्रबळ असा परिणाम होतो, हें तत्त्व पटविलेलें आहे; व स्त्रीपुरुषांच्या हृदयदरींतील ज्या कांहीं भाव-भावनांकडे पूर्वकालीन कादंबरीकारांनीं दुर्लक्ष केलें होतें त्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. (३) त्यांच्या कादंबऱ्या केवळ मनोविनोदनार्थ नाहींत, तर त्या विचारप्रवर्तक आहेत. ( आणि सद्भावना-पोषकहि आहेत असें मी म्हणेन, पण हें कांहीं वाचकांना मान्य होणार नाहीं. )

  [ १ ] केतकरपूर्व कादंबऱ्या ' सदाशिवपेठी ' होत्या याचा सामान्यतः समजण्यांत येणारा अर्थ असा की, त्यांत सदाशिवादि ब्राह्मणी पेठांत राहणाऱ्या व तत्सम अशा मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गाचंच वर्णन होतें. केतकरांनीं हें निन्दागर्भ विशेषण लाविलें तेव्हां त्यांच्या मनांतील अर्थ अधिक व्यापक होता. 'सदाशिवपेठी ' मध्यमवर्गाची व त्यांतील बुद्धिमान् व पुढारी गणलेल्या लोकांचीहि जी विशिष्ट दृष्टि, विशिष्ट मनोरचना, विशिष्ट विचारपद्धति ( ही त्यांच्या मतें अत्यंत संकुचित व अशास्त्रीय होती ), ती या विशेषणाच्या द्वारें व्यक्त करण्याची त्यांची इच्छा होती, हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्यांत विविध जातीय पात्रें आलीं नाहींत असें नाहीं, परंतु र्ती थोडीं आहेत व विशेष महत्त्वाचीं नाहींत. केतकरांच्या कादंबऱ्या आपणापुढे महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय, पांढरपेशा, अशिक्षित व सुशिक्षित स्त्रीपुरुषांचेंच वर्णन करूनच थांबत नाहींत, तर त्या नागपुरी, बंगाली, पंजाबी इत्यादि लोकांशीं आपला परिचय करून देतात; त्या .