पान:विचार सौंदर्य.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२ 

विचार सौंदर्य


रचना असावी व लोकमत तदनुकूल असावें, अशी त्यांची शिकवण दिसते. हिंदूंमधील मिश्र विवाहाचीं अनेक लोभनीय उदाहरणें त्यानीं चितारलेली आहेत, इतकेंच नव्हे, तर यहुदी व ख्रिश्चन धर्मातील स्त्रियांशी हिंदु पुरुषाचें लग्न झालें तर त्यांत कांहीं गैर नाहीं असा ग्रह त्यांच्या कादंबऱ्या वाचून होतो. धर्माचा आणि विवाहाचा कांहीं संबंध नाहीं असें मत अनेक रीतीनें त्यांनी प्रतिपादिलेलें आहे. विवाहबाह्य स्त्रीपुरुषसंबंध देखील या कादंबऱ्यांत मान्यता पावलेला आहे ! या सर्व बाबतींत केतकरांकडे कांहीं दोष येतो किंवा नाहीं हा आपल्यापुढचा प्रश्न आहे.

 कादंब-यांमध्ये मतप्रचार असण्यास हरकत नाहीं असें केतकरांचें मत होतें आणि तें मलाहि बरोबर दिसतें. मतप्रचार केलाच पाहिजे असें नाहीं; पण कलेचीं तत्त्वें व नियमनें संभाळून आणि रसहानि होऊं न देतां मतप्रचार करतां आला तर त्यांत गैर काय आहे हे मात्र समजत नाहीं. कादंबरीकाराचीं मतें लोकविद्विष्ट असलीं तर रसोत्पत्ति करणे कठीण पडेल, परंतु तत्त्वतः तीं कादंबरीलेखनांत वर्ज्य समजण्याचें कारण नाहीं. नीतिअनीतिच्या कल्पना बदलत असतात व त्या समंजस माणसांनीं बदलण्याचा प्रयत्नहि करावा, हें तत्त्व मान्य करणें प्राप्त आहे. अर्थात् कादंबरीकाराला कलाविषयक ध्येयांना आणि नियमांना बाध न आणतां असा प्रयत्न करतां आल्यास त्यानें तो अवश्य करावा हे उघड आहे. नीतिदृष्ट्या मर्यादा घालावयाचीच तर ती एवढीच घालतां येईल कीं, जगांत नीति-अनीति म्हणून कांहीं पदार्थच नाहीं, ज्यानें त्यानें मनःपूत आचरण करावें, अशा प्रकारचीं नीतीच्या मुळावरच आघात करणारी मतें त्यांत नसावी. (कादंबरीकाराची अशीच मतें असल्यास त्यानें तीहि सूचित करण्यास हरकत नाहीं, असें माझें मत आहे. ) तात्पर्यार्थ एवढाच कीं, कादंबरीकाराला नीति मान्य असावी. परंतु प्रचलित नीतीपेक्षां भिन्न आणि उच्चतर नीति त्याला जी अभिमत असेल तिचा पुरस्कार करण्यास त्याला प्रतिबंध नसावा. या तत्त्वाची कसोटी केतकरांच्या कादंबऱ्यांना लावली असतां त्या कितीहि लोकविलक्षण मतांचा पुरस्कार करणाऱ्या असल्या तरी निर्दोषच नव्हे तर अभिनंदनीयहि वाटतात, असें माझें निश्चित मत आहे. किंबहुना याच्यापुढेंहि जाऊन मी असें म्हणेन कीं, केतकरांनीं