पान:विचार सौंदर्य.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

६१


स्वभावांत व वर्तनांत फरक घडून येतो; आणि तीं पात्रे त्याविषयीं स्वतःशीं विचार करीत राहतात आणि इतरांशीं तद्विषयक चर्चाहि करितात. कादंब-यांमध्ये प्रसंग व कृति यांमुळे कथानकाला चालना व गति मिळावी असें म्हणतात, पण केतकरांच्या कादंबऱ्यांतील ब्रह्मगिरीबुवा, विचक्षणा, प्रियंवदा, इत्यादि किती तरी पात्रें अर्शी आहेत कीं, तीं स्वतः आणि त्यांच्या भोंवतालची मंडळी यांच्याविषयींचे 'प्रसंग' व त्यांच्या 'कृति' वाचनाच्या, वादविवादांच्या आणि आत्मनिरीक्षणाच्या निमित्तानें बरीचशीं निर्माण झालेली आहेत. अशा व्यक्तींचें स्वभावदिग्दर्शन व त्यांच्या 'कृतीं 'चें वर्णन करतांना वादविवाद व तत्वचर्चा आल्याशिवाय कशी राहील ? उदाहरणार्थ, ' ब्राह्मणकन्यें 'तील वैजनाथशास्त्री किंवा 'आशावादीं 'तील ब्रह्मगिरीबुवा यांची विशिष्ट विचारपद्धति व समाजशास्त्रविषयक दृष्टि यांचें थोडेंबहुत वर्णन केल्याशिवाय कादंबरीला इष्ट असलेले विशिष्ट वातावरण निर्माण होणार नाहीं, आणि त्या त्या व्यक्तींच्या स्वभावांत व वर्तनांत झालेले बदल समजणार नाहीत, आणि प्रत्ययकारक तर होणारच नाहींत. विचारात्मक वर्णनाचा विस्तार जरुरीपेक्षां कांहीं ठिकाण अधिक झाला आहे हे मला मान्य आहे; परंतु तो कां झाला याचें थोडेंसें स्पष्टीकरण येथें केलेले आहे. केतकरांच्या कादंबऱ्यांतील चौथा विशेष म्हणजे त्यांत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मतप्रचार असतो. कांहींच्या मतें त्यांची मतें क्रांतिकारक आहेत इतकेंच नव्हे, तर अनीतिप्रवर्तक आहेत. 'ब्राह्मणकन्यें' तील कालिंदीबद्दल वाचकांना प्रथमच सहानुभूति वाटते, आणि ती शिवशरणप्पा नांवाच्या व्यापाऱ्यांशी त्याची केवळ रखेली म्हणून राहते हैं वाचकाला कळलें तरीहि तिच्याबद्दल सहानुभूतिच वाटते. 'गोंडवनांतील प्रियंवदें' त वर्णिलेला हरिभय्या मोघे एका कुलीन स्त्रीशीं प्रथम लगट करितो आणि नंतर प्रेमलीला करितो; तथापि, तें वर्णन वाचतांना त्याचा राग येत नाहीं. 'गांवसासू' कादंबरीमध्यें तर प्रेमसंपादनकलेची आवश्यकताच वर्णिलेली दिसते; आणि स्त्रीपुरुषांनी एकमेकांची शिकार साधण्याचा जो प्रयत्न केलेला असतो त्याला वडीलधाऱ्या गांव-सासवांनीं साहाय्य करावें, असें सूचित केलेले दिसतें. वेश्यांविषयीं तर बहुतेक सर्व कादंबऱ्यांत केतकरांची सहानुभूति दिसते आणि त्यांना समाजांत स्वाभिमानपूर्वक राहतां येईल अशी समाज-