पान:विचार सौंदर्य.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६० 

विचार सौंदर्य


आहे असें तर वाटतेंच, पण खरा भाग कोणता हें त्याला न कळल्यामुळे त्याच्या मनांत विपरीत ग्रह उत्पन्न होण्याचा संभव असतो. सगळ्यांत वाईट गोष्ट अशी की, त्या व्यक्तीबद्दल खरी व संपूर्ण माहिती असणान्यांना कादंबरीमुळे उत्पन्न होणारे चुकीचे ग्रह दूर करावेसे वाटले तरी त्याला ते दूर करण्यास अनुकूल परिस्थिति उपलब्ध होत नाहीं; कारण,कादंबरीकार " मीं या व्यक्तींबद्दल लिहिलें नाहीं " असें म्हणून मोकळा होण्याचा संभव असतो; आणि गैरसमज दूर करूं पाहणान्यावर विकतचें श्राद्ध घेतल्याचा आरोप येऊं पाहतो ! कांहीं इंग्रज ग्रंथकारांनीं जिवंत व्यक्तींना आपल्या नाटकांत वगैरे खेचून आणिलें आहे, हा दाखला तत्त्वचिन्तनदृष्ट्या विशेष महत्त्वाचा नाहीं. ( वर्णन करतां करतां सहजगत्या आलेला व्यक्तिविषयक एखादा उल्लेख -- विशेषतः अनुकूल किंवा किरकोळ स्वरूपाचा उल्लेख - दूषणीय नाहीं, हें कंसांत सांगितलेलें बरें.)

 “ वाङ्मयविषयक परीक्षणाचीं अत्युच्च तत्त्वें इंग्लंडमध्येंच काय, जगामध्यें निर्माण व्हावयाची आहेत ", असें डॉ. केतकरांचा एखादा कैवारी त्यांच्याच शब्दांत ('गांवसासू' प्रस्तावना), वरील टीकेला उत्तर देईल आणि "महाराष्ट्रांत वाङमयपरीक्षणाच्या विचारांवर 'पंतोजी ' विचारांचें आवरण वाजवीपेक्षा जास्त पडले आहे”, असेंहि त्यांच्याच शब्दांत (व माझ्या 'पंतोजी' - पेशावर कोटि करून) म्हणेल. परंतु हीं केवळ असिद्ध विधानें आहेत, युक्तिवाद त्यांत कांहीं दिलेला नाहीं, म्हणून त्यांचा विचार करीत नाहीं.

 केतकरांच्या कादंबऱ्यांचा तिसरा एक विशेष हा आहे कीं, त्यांत नीतिशास्त्रविषयक व समाजशास्त्रविषयक वादविवाद व निबंधवजा विस्तृत विवेचन आलेले आहे. हे वादविवाद व हें विवेचन मला आवडलें, पण पुष्कळांना तें कंटाळवाणें होते असे दिसतें. कलादृष्ट्या हा दोष आहे हैं प्रथमच मान्य करून तद्विषयक थोडेंसें समर्थन करणें इष्ट वाटतें. (माझ्या कादंब-यांवर थोडासा असाच आक्षेप घेण्यांत येतो हैं या 'इष्ट वाटण्याच्या' बुडाशी असण्याचा संभव आहे ! ) प्रथम हैं ध्यानांत धरलें पाहिजे कीं, केतकरांचीं प्रमुख पात्रें सुशिक्षित, विचारप्रवण, मननशील, आत्मानिरीक्षणपर व विवादप्रिय आहेत. परिस्थितींतील भौतिक स्वरूपाच्या मोठ्या घडामोडीं- पेक्षांहि विचारांच्या व भावनांच्या क्षेत्रांतील सूक्ष्म छटांनींहि त्यांच्या