पान:विचार सौंदर्य.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

५९


प्रश्न टाळून त्याला बगल दिलेली आहे. अमुक एका पात्रावरून अमुक एका व्यक्तीची आठवण झाली तर तो कादंबरीकाराचा दोष नसेल. परंतु अमुक एक पात्र म्हणजे अमुक एक व्यक्ति असा भास उत्पन्न होईल असेंच नव्हे, तर असा भास उत्पन्न व्हावा असा हेतु जेथें स्पष्ट दिसतो, तेथें पात्रवर्णन वाङ्मयदृष्ट्या इष्ट आहे किंवा नाहीं हा प्रश्न आहे. लाला गजपतराय म्हटलें म्हणजे लाला लजपतराय यांची आठवण व्हायचीच. हें पात्र म्हणजे लाला लजपतराय असें वाटावें असें वर्णन करावयाचें आणि पुनः " कोणाहि व्यक्तीला उद्देशून या कादंबरीतील पात्र नाहीं " असें म्हणावयाचें, हे आपल्या विचाराला पटत नाहीं. इतिहाससंशोधक राजवाडे यांचे चित्र डोळ्यांपुढे यावें अशा प्रकारची वैजनाथशास्त्र्यांची वाङ्मयात्मक छवी काढावयाची आणि पुनः " कोणाहि व्यक्तीला उद्देशून या कादंबरीतील पात्र नाहीं' असे सांगावयाचें, हा सरळपणा नव्हे. अशा प्रकारचीं पात्रें ललित वाङ्मयांत आणणें क्वचित् अपवादात्मक प्रसंगी समर्थनीय असले तरी तें एकंदरींत अप्रशस्त आहे, असे माझे मत आहे. विशिष्ट व्यक्तीचें आपण जर चरित्र लिहितों तर त्यांचें ललित वाङ्मयांत स्वभावचित्र काढण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न कोणीं विचारल्यास त्याचें उत्तर असे आहे : उघड उघड चरित्र असले म्हणजे अनुकूल- प्रतिकूल बाजूंची चर्चा लेखक करतो व वाचकाला आपले मत बनवितां येतें. शिवाय दुसऱ्या लेखकांना त्यांतील चुका, हेत्वाभास, इत्यादि दाखवितां येतात. कादंबऱ्यांमध्यें हल्ला केला गेला असल्यास तो चोरटा असतो-- अमुक एका व्यक्तीचे चित्रच हें नाहीं असें म्हणतां येतें ! दुसरी गोष्ट म्हणजे, कादंबऱ्यांमध्यें विशिष्ट व्यक्तींबद्दलच्या अगदीं खऱ्याखुऱ्या कांहीं गोष्टी चितारलेल्या असल्या तरी त्यांत कांहीं थोड्या अंगांचेंच दिग्दर्शन येतें व त्यायोगे त्या व्यक्तींच्या बाबतींत अन्याय होण्याचा संभव असतो. तिसरी गोष्ट अशी कीं, विशिष्ट व्यक्तीचें चित्र आहे असा कायद्याच्या व इतर दृष्टींनीं आरोप येऊं नये म्हणून, त्याचप्रमाणें कथानकाच्या सोयीकरितांहि, त्या व्यक्तींच्या वर्णनामध्ये काल्पनिक प्रसंगांची, स्वभावविशेषांची वगैरे भर घातली जाते; अर्थात् त्या व्यक्तींसंबंधीं पूर्ण माहिती नसलेल्या वाचकास अमुक एका व्यक्तीचें चित्र