पान:विचार सौंदर्य.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८ 

विचार सौंदर्य


त्याचप्रमाणें घरकुट्टे घराण्याच्या पूर्वेतिहासाचें वगैरे वर्णन रसहानिकारक आहे. 'वृक्षराजी ' च्या दाखल्यानें त्या वर्णनांचा बेडौलपणा समर्थनीय ठरूं शकत नाहीं, हें मान्य केले पाहिजे. अर्थात् या वर्णनामध्यें कलात्मक सौंदर्याव्यतिरिक्त इतर दृष्टींनीं वाचनीयत्व व मननीयत्व असेल, किंबहुना एक प्रकारचें सौंदर्यहि असूं शकेल. पण कादंबरीविषयक कलेच्या दृष्टीने पाहतां त्यांचें सदोषत्व मान्य केले पाहिजे. 'प्रियंवदे'संबंधी या प्रकरणीं जे म्हटलें तें बहुतेक इतर कादंबऱ्यांसंबंधीहि लागूं पडतें, म्हणजे त्यांतील कथानकप्रसंगांत प्रमाणशीरपणा, एकजीवपणा, ठाकठिकी, इत्यादि गुणांचा थोड्याबहुत प्रमाणांत अभाव आहे, असे मला म्हणावयाचें आहे.

 केतकरांच्या बहुतेक कादंबऱ्यांमध्ये वैजनाथशास्त्री, लाला गजपतराय प्रभृति अशीं कांहीं पात्रे आहेत कीं, तीं समाजांतील विशिष्ट व्यक्तींवरून घेतली आहेत असा भास होतो. अशीं पात्रें रंगविणें वाङ्मयदृष्ट्या इष्ट कीं अनिष्ट हा त्यांच्या कादंबऱ्यांवरून सुचणारा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. केतकरांचें यासंबंधी काय मत होतें हैं निश्चयानें सांगतां येत नाहीं, तथापि, यासंबंधानें त्यांचे कांहीं उल्लेख आहेत ते नमूद करून ठेविले पाहिजेत. 'गोंडवनांतील प्रियंवदे 'च्या प्रस्तावनेंत ते म्हणतात," लेखक लिहूं लागला म्हणजे त्यास परिचित अशा विषयांची स्मृति जागृत होऊन अनेक देखावे दिसूं लागतात आणि ते स्वाभाविकपणें कथानकांत उतरतात." ‘आशावादी' च्या प्रस्तावनेंत याहून स्पष्ट असा उल्लेख आहे. तेथें ते म्हणतात : “ 'आशावादी ' ही कथा लिहितांना माझ्या डोळ्यांसमोर अनेक व्यक्ति होत्या. त्या व्यक्तींच्या आयुष्याचें एकीकरण करून हें कथानक तयार झाले आहे. " 'गांवसासू ' च्या प्रस्तावनेंत आपल्यावर येणाऱ्या आक्षेपांचें त्यांनीं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते सांगतात : " जरी या कथेंतील प्रत्येक सामाजिक विधान दृश्य सृष्टीतील आहे तरी कोणाहि व्यक्तीला उद्देशून या कादंबरींतील पात्र नाहीं. प्रस्तुत गोष्ट या कादंबरीसंबंधानेंच आहे असें नाहीं, तर माझ्या सर्वच कादंबऱ्यां- संबंधानें आहे. कादंबरीतील पात्रे म्हणजे विशिष्ट व्यक्ति असे कोणत्याहि पात्रासंबंधानें म्हणतां येणार नाहीं. " या समर्थनानें कोणाचें समाधान होईल असे वाटत नाहीं; त्यांत मुख्य