पान:विचार सौंदर्य.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

५७

नाहीं. वनस्पतिसौंदर्याला लतावेष्टित एकच वृक्ष पाहिजे असें नाहीं, अनेक वृक्षांची राजि हीदेखील सुंदर असूं शकेल, हें मान्य आहे. परंतु हे अनेक वृक्ष एका सरळ किंवा विशिष्ट वक्र रेषेंत नसले, त्यांच्यामधील अंतर प्रमाणशीर नसलें, त्यांच्या फांद्यांच्या गुंतागुंतींत कृत्रिमपणा किंवा ढिलेपणा असला व त्यांची रचना बेडौल असली, तर वृक्षराजीचा सुंदर दाखला, जुन्या शास्त्रीय नियमाची गर्भित चेष्टा, युरोपीय कादंबऱ्यांचीं उदाहरणें किंवा सदोषत्व नाकबूल केल्यास 'मार्मिकपणा 'चें आपोआप येणारें केतकरी प्रमाणपत्र, यांपैकी कांहींहि त्या वृक्षराजीचें सदोषत्व झांकण्यास समर्थ होणार नाहीं. समाजामध्यें वास्तविक पाहतां अनेक घराण्यांचा व व्यक्तींचा एकमेकांवर परिणाम होत असतो हैं खरें आहे; आणि संसाराचें खरें व संपूर्ण प्रतिबिंब दाखवावयाचें असल्यास सर्व घराण्यांचीं व व्यक्तींचीं वर्णनें येणारच. पण कादंबऱ्यांमध्यें " संसाराचें खरें व संपूर्ण प्रतिबिंब " येणें शक्यच नाहीं, कारण, तें यावयाचें म्हणजे मग त्यांत यच्चयावत् सर्व व्यक्तींचें व घराण्यांचें वर्णन द्यावें लागेल ! खोल तत्त्वज्ञानांत शिरलें तर प्रत्येक अणूचा इतर सर्व अणूंशीं कांहीं तरी संबंध असतोच, निदान अल्पतम गुरुत्वाकर्षणाचा तरी संबंध असतोच ! व्यक्तींचेंहि असेंच आहे. कालीइलनें एके ठिकाण म्हटले आहे कीं, अॅटलांटिक महासागरांत एक मासा जरी कमीअधिक झाला, तरी युरोपांतील सर्व माणसांवर त्याचा अल्पतम का होईना, कांहीं तरी परिणाम होईलच. तसेंच तो दुसरे एके ठिकाण म्हणतो कीं, " एका रक्तवर्ण हिन्दी " तरुणानें आपल्या बायकोला बडविलें तर इंग्लंडांतील बायकांवर त्याचा परिणाम होईल ! हृीं अतिशयोक्तीचीं वचनें देण्याचा हेतु एवढाच कीं, अनेक घराण्यांचा व व्यक्तींचा एकमेकांशी संबंध आला व एकमेकांवर त्यांचा परिणाम झाला असला, तरी एवढ्याकरितां त्या सर्वांचे वर्णन कादंबरींत आलेच पाहिजे असें नाहीं. कलात्मक कादंबरी ही 'संपूर्ण सत्या 'वर अधिष्ठित नाहीं, तर निवड करून सार्थ, साभिप्राय, लक्षणीय, कथनीय अशा सत्यावर ती अधिष्ठित आहे. हे अधिष्ठानदेखील समतोलपणा, प्रमाणशीरपणा, इत्यादि कलात्मक ध्येयांनीं नियमित व मर्यादित आहे. अशा दृष्टीने पाहतां ‘ प्रियंवदें ’तील वैजनाथशास्त्री यांच्या मतांचें वगैरे पाल्हाळिक वर्णन,