पान:विचार सौंदर्य.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ 

विचार सौंदर्य


ठेकेदारानें नेट लावला म्हणजेच विचार कागदावर उठतात" या त्यांच्या स्वानुभवाप्रमाणें छापखानेवाल्याचे तगादे, अशा प्रकारच्या अनेकविध कारणांना त्यांच्या कादंबरीरचनेचें श्रेय दिले पाहिजे. या कारणांत वाङ्मयात्मक कलेचें, सौंदर्याचें किंवा लालित्याचें प्रेम या कारणाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाहीं. कारण, हें प्रेम असलेच तर तें विशेष प्रभावी नव्हते आणि त्याचें डॉ. केतकरांना विशेष महत्त्व वाटले नाहीं, हें मला सांगावयाचे आहे. एखादा नीतिनिष्ठ मनुष्य एखादी स्त्री ' शीलवती ' आहे किंवा नाहीं या गोष्टीलाच महत्त्व देतो; तिच्या जातीकडे, धर्माकडे किंवा पोषाखाकडे विशेष लक्ष देत नाहीं, त्याचप्रमाणें डॉ. केतकर हे विचारविषयक सत्याविषयी दक्ष असत, परंतु सत्यकथनाच्या रीतीविषयी बेफिकीर असत. एखाद्या किरकोळ विषयासंबंधींहि माहिती मिळविण्याकरितां ते दहावीस पुस्तकें पालथी घालीत आणि महिना दोन महिने वेळ दवडीत; एखादा विचार तर्कशुद्ध आहे किंवा नाहीं हें पारखण्याकरितां ते पुष्कळ वेळां अनेक लोकांशीं वादविवाद करीत; परंतु या माहितीची किंवा या विचारांची सुंदर मांडणी किंवा सजवणूक करण्याकरितां वेळ दवडणें त्यांना आवडत नसे, किंवा परवडत नसे म्हणा पाहिजे तर !

 या वृत्तीच्या पाठीमागें कलेच्या तत्त्वासंबंधानें व स्वरूपासंबंधानें एकदोन हेत्वाभास लपलेले आहेत. केतकरांना वाटावयाचें कीं, सत्य हें स्वभावतःच सुंदर आहे (Truth is Beauty), आणि तें अंशतः खरेंहि आहे. हिन्याला जशी कोंदणाची आवश्यकता नसते किंवा हपूसच्या आंब्याला साखर किंवा केशर लावण्याची जरूरी नसते तशीच कांहींशी शास्त्रीय सत्यांची गोष्ट असते. तीं जात्याच सुंदर असतात. पण कांहीं सत्यें अज्ञानपटलामुळे म्हणा किंवा इतर कशामुळे म्हणा, जाणत्यांना जरी जात्याच सुंदर भासलीं तरी सर्वांना तशीं भासतील असें नाहीं. कलावंताला कांही सत्यें दिसलीं म्हणजे आनंद होतो, पण त्याचें कार्य एवढ्याने संपत नाहीं. त्याच्या कार्याला या आनंदापासून केवळ आरंभ होतो व हा आनंद दुसऱ्याच्या अनुभवाला येईल अशी कृति निर्माण करणें हें त्याचें खरें कार्य असतें.

 "मराठीतील सर्व काव्यें जाळलीं तरी जगाच्या दृष्टीनें विशेष कांहीं हानि होणार नाहीं", अशा आशयाचें केतकरांनीं जें विधान केलेले आहे त्यांत एक