पान:विचार सौंदर्य.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

५३


सर्वांगीण परीक्षण करणे या लेखांत शक्य नाहीं. यास्तव त्यांच्या कादंबऱ्या वाचून जे प्रश्न मनांत उत्पन्न होतात त्यांपैकी कांहींचाच विचार येथें करण्याचे योजिलें आहे.

 डॉ. केतकरांनी एकंदर सात कादंबऱ्या लिहिल्याः-

 ( १ ) गोंडवनांतील प्रियंवदा ( १९२६ )

 ( २ ) परागंदा ( १९२६)

 ( ३ ) आशावादी (१९२७)

 (४) गांवसासू ( १९३०)

 ( ५ ) ब्राह्मणकन्या (१९३०)

 ( ६ ) विचक्षणा ( १९३६-३७)

 ( ७) भटक्या ( १९३८)

 "तुम्हीं पाहिजे तर निबंध लिहावेत, पण कादंबरीच्या भानगडींत पडूं नये," असें त्यांचे परममित्र अमरावतीचे कादंबरीकार श्री. बाळकृष्ण संतुराम गडकरी यांनीं निर्भीडपणें त्यांच्या तोंडावर सांगितलें असतां, डॉ. केतकर कादंबरी लेखनास कां प्रवृत्त झाले याचें एक उत्तर स्वतः त्यांनींच असें दिलें आहे कीं, “ मागणी तसा पुरवठा केला पाहिजे म्हणून”. " छापखानेवाल्यांनीं 'कॉपी पाहिजे' असा तगादा लावला म्हणजे लेखकाला लिहिणें भागच पडतें, " हें त्यांचें दुसरें उत्तर. हीं दोन थोडींशीं विनोदबुद्धीनें, थोडींशीं अतिशयोक्तीच्या हौशीमुळें आणि थोडीशीं कटु सत्यकथनाच्या दृष्टीनें दिलेलीं उत्तरें बाजूस ठेविलीं, तर त्याचें खरें उत्तर असें द्यावें लागेल कीं, समाजाचें पुष्कळ अवलोकन व मनन केल्यामुळे त्यांच्या मनांत हजारों विचार येत असत, या विचारांना व्यक्त स्वरूप दिल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसणें शक्य नव्हतें, आणि आत्मविश्वास दांडगा असल्यामुळे व्यवहारदृष्ट्या लाभकारक व कीर्तिदायक अशा साधनाचा, म्हणजे कादंबरीलेखनाचा त्यांनीं आश्रय केला. तात्पर्य, विचारांची विपुलता, ते व्यक्त करण्याची अनिवार्य इच्छा, कोठल्याहि साधनाच्या द्वारे आपण यश संपादन करूं असा आत्मविश्वास, कीर्ति सहजगत्या हस्तगत होईल आणि ती आपल्या उच्चतर व गंभीरतर स्वरूपाच्या कार्याला उपयुक्त होईल अशी आशा, सुलभद्रव्यलालसा आणि " छापखान्यांतील खिळेजुळणीच्या