पान:विचार सौंदर्य.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर



 विद्वान् व तर्कप्रवीण ग्रंथकाराला विदग्ध व ललित वाङ्मय निर्माण करतां येणें अशक्य नसले तरी कठीण आहे अशी सामान्य समजूत आहे आणि ती कांहीं व्यक्तींच्या बाबतींत खरीहि आहे; परंतु इतर कांहीं व्यक्तींकडे पाहतां ती खोटीहि ठरते. खरी गोष्ट अशी आहे कीं, विद्वत्त्व आणि तार्किकत्व यांमध्ये असा कांहीं गुण नाहीं कीं, त्यायोगें सूर्याच्या प्रखर तेजामुळे ज्याप्रमाणें फुलें कोमेजून जातात किंवा चंद्राचें तेज फिके पडतें, त्याप्रमाणे एखाद्याच्या अंगी जात्याच असलेली कलात्मक प्रतिभा लोपून किंवा गुदमरून जावी. बरेच विद्वान् लोक हे कवि नसतात आणि बरेच कवि विद्वान् नसतात. यावरून विद्वत्त्व आणि कवित्व यांचा अहिनकुलवत् किंवा तमःप्रकाशवत् शाश्वत विरोधात्मक संबंध असावा असे वाटणें साहजिक आहे; पण हें तर्कशुद्ध अनुमान नव्हे. पूर्वीच जगन्नाथादिकांची उदाहरणें सोडून दिलीं आणि अलीकडचीं उदाहरणें घेतलीं तर प्रो. फडके, डॉ. माधवराव पटवर्धन यांच्यासारखे लेखक तर्कशास्त्रांत जसे प्रवीण आहेत तसेच ललित वाङ्मयांतदेखील कुशल आहेत असे दिसून येतें. डॉ. केतकर यांचेंहि नांव अशा उदाहरणांमध्ये समाविष्ट करण्यास हरकत नाहीं, असें मीं म्हटले तर तें प्रथमदर्शनीं तरी कांहीं लोकांना चमत्कारिक वाटेल; कारण त्यांच्या कादंबऱ्यांची भाषा रुक्ष, रचना शिथिल, घडण ओबडधोबड आणि एकंदर कृति पांडित्याच्या भारानें जाड्य आणि उग्रता पावलेली आहे असें समजण्यांत येतें. तथापि, कादंबरीक्षेत्रांतहि डॉ. केतकरांनीं नांव घेण्यासारखी कामगिरी केली आहे असें माझें मत आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्यें दोष आहेत; पण त्यांनी मराठी कादंबरीवाङ्मयांत चांगली भर घालून कादंबरीविषयक टीकाकाराला आपले जुने कलात्मक विचार तपासून पाहण्यास लाविलें आहे यांत शंका नाहीं. त्यांच्या कादंबऱ्यांचें