पान:विचार सौंदर्य.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४६ 

विचार सौंदर्य


अनेक दृष्टींनीं अनेकांनी केलेली मीमांसा यांत पाहण्यास मिळते; पण एका हातचें चित्र किंवा काव्य जसें सुसंघटित दिसतें व त्याची अनेक अंगें जशीं अन्योन्याश्रयी व परस्परपोषक दिसतात तसें यांत झालेले नाहीं. परिणतप्रज्ञ झालेले नसतांना केळकरांनीं हैं पुस्तक लिहिलेले आहे याचें एक उदाहरण 'भाव' शब्दाच्या लक्षणाबद्दलचें - मागे दिलेलेच आहे. पृ. ३१ वर 'गुण' शब्दाचा उपयोग त्यांनीं अशाच ढिलेपणानें केलेला आहे. 'गुण हे रसांचे धर्म आहेत' असें प्रथम म्हणून 'ज्या शब्दार्थगुणामुळे अंतःकरण द्रवीभूत होतें तो गुण माधुर्य होय" असें ते सांगतात व यांत विसंगति आहे हें क्षणभर विसरतात. अशा प्रकारचा ढिलेपणा क्वचित् प्रसंगींच आहे, पण तो आहे. आल्हाददायक उपमा, समर्पक दाखले वगैरे, केळकरांच्या कोणत्याहि लिखाणांत यावयाचेच. कारण ही त्यांना ईश्वरदत्त देणगीच आहे, पण या ग्रंथाचें ग्रथन शिथिल असल्यामुळे व विचारांत निश्चिततेचें व आत्मप्रत्ययाचें तेज नसल्यामुळे या उपमादिकांचें जेवढें तेज पडावें तेवढे पडत नाहीं.

 असो. या पुस्तकाबद्दल सामान्य विवेचन अधिक न करतां अंतरंगाकडे वळू या. केळकरांनी प्रथम सुभाषित, कोटि, (Wit,Humour) इत्यादि शब्दांचा अर्थ निरनिराळ्या ग्रंथकारांची मतें व उदाहरणें देऊन निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मतें परिभाषेची सध्यांची अनिश्चितता ध्यानांत घेऊन पुढील समीकरण मान्य करण्यांत यावें.

 Wit and Humour = सुभाषित ( हास्यरसोत्पादक शब्दप्रबंध ).

 Humour = विनोद (वचन ). Wit = कोटि, वैदग्ध्य.

 पृष्ठ १६ वर ते म्हणतात कीं, संस्कृतांतील 'विनोद' हा शब्द उभयार्थ- व्यंजक असा असल्यामुळे तो कोटि, चतुरालाप, विनोदवचन या सर्वांवर व्याप्ति असणारा, जातिवाचक, असा आम्हीं योजिला आहे. मग कोटीहून भिन्न असलेला जो विनोद त्याला शब्द कोणता ? मला वाटतें जातिवाचक शब्द 'सुभाषित' व त्याच्या एका अंगाला विनोद व दुसऱ्या अंगाला 'कोटि' म्हणावें. वरील समीकरणावरून हाच बोध प्रथमदर्शनीं होतो. पण पृष्ठ १६ वरील वाक्यानें संदिग्धता उत्पन्न झाली आहे. त्यांतली खरी गोष्ट अशी आहे कीं, इंग्लिशमध्यें ज्याप्रमाणें Wit, Humour हे शब्द निरनिराळ्या लोकांनीं निरनिराळ्या अर्थांनी पूर्वी वापरले त्याप्रमाणें