पान:विचार सौंदर्य.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

४५


जिव्हातादात्म्य हें आम्ररसानंदाचें कारण सांगितलें तर तें जितकें खरें आहे व सदोषहि आहे तितकेंच सविकल्प समाधीचें काव्यानन्दविषयक तत्त्व खरें व सदोषहि आहे.

 आतां कोणी म्हणेल कीं,"तादात्म्य तेथें असतेंच ना, आणि या तादात्म्यांत तुम्हीं म्हणतां त्या सर्व अनुभवांचा अंतर्भाव होत नाहीं काय ?" तर यावर असे उत्तर कीं, काव्यानन्दाचें कारण सांगतांना 'काव्यानन्द होईल अशा प्रकारच्या सर्व अनुभवांशीं तादात्म्य किंवा समाधि' असें जर उत्तर दिलें तर तें खरें आहे. पण 'अश्व म्हणजे घोडा ' किंवा 'अफूपासून झोंप कां येते तर त्यांत झोंप आणण्याचा गुण आहे' अशा प्रकारचें हें शब्द-प्रति-शब्द सत्य किंवा द्विरुक्तिसत्य आहे, त्यांत नवीन कांहींच नाहीं. आतां वरील कारणांतील तादात्म्याला सविकल्प हें विशेषण जर लावलें तर मात्र त्यांत कांहीं विशेष सांगितल्यासारखें होईल आणि हा विशेषच केळकरांच्या उपपत्तीचा सत्यांश रूपानें राहील. बाकी 'समाधि ' ही एखाद्या किरकोळ संन्याश्याच्या समाधीप्रमाणे नाममात्रेंकरूनच पूज्य राहील !

 हास्यरसाची केळकरांनीं जी मीमांसा केली आहे तिचा आतां विचार करूं या. ही मीमांसा वर थोडीबहुत आलीच आहे, व ती ज्या पुस्तकांत केळकरांनी केली आहे त्या 'सुभाषित व विनोद' या पुस्तकाचेहि उल्लेख आलेलेच आहेत. हे पुस्तक हरतऱ्हेच्या कोट्यांच्या, सुभाषितांच्या, विनोदी वचनांच्या उदाहरणांनीं भरलेले आहे, अर्थात् तें अनेकांच्या आनंदास कारणीभूत झालेले आहे. पण हा त्याचा विशेष नव्हे, त्यांत हास्यरसाबद्दल जी अनेक दृष्टींनी चर्चा केलेली आहे ती फार महत्वाची आहे. तींत केळकरांचे बहुश्रुतपणा, मार्मिकपणा वगैरे गुण दिसून येतात. भाषेचें मात्र सौंदर्य जितकें दिसावें तितकें दिसत नाहीं. (अर्थात् केळकरांनीं तदनंतर लिहिलेल्या लेखांत व पुस्तकांत जितकें दिसतें त्या मानानें येथें दिसत नाहीं असें म्हणावयाचें आहे, -—इतर अनेक लेखकांच्या मानानें तें किती तरी पटीनें येथें दिसतें.) नवशिके लेखक म्हणून म्हणा किंवा विचारांची एक सुंदरशी घडी त्या वेळीं बसलेली नव्हती म्हणून म्हणा किंवा लेखनास कालावधि पुरेसा न मिळाल्यामुळे म्हणा, हें पुस्तक म्हणजे अनेक सुंदर व मौल्यवान् वस्तूंनी भरलेल्या अव्यवस्थित दिवाणखान्यासारखें झाले आहे. हास्यरसाविषयींची