पान:विचार सौंदर्य.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४४ 

विचार सौंदर्य


पावलों म्हणून मौज किंवा आनंद वाटणार नाहीं, तर त्या देखाव्यांतील विपरी- तत्व पाहून आनंद वाटेल. या उदाहरणापेक्षां ज्याला नाट्योचित गूढार्थित्व ( Dramatic irony ) म्हणतात, तसला एखादा प्रसंग डोळ्यांपुढे आणा. एखाद्या नायिकेनें कांहीं कारणास्तव पुरुषाचा पोषाख धारण केलेला आहे व नायकानें बुरखा घेतलेल्या स्त्रीचा पोषाख घेतला आहे आणि उभयतांना हें रूपांतर ठाऊक नाहीं अशा स्थितीत त्यांचा जो संवाद होईल त्यांत असा पुष्कळ भाग आणतां येईल कीं, त्यापासून खरी वस्तुस्थिति जाणणाऱ्या प्रेक्ष- कांना हास्यरसजन्य आनंद होईल; पण त्या नायकनायिकांना तो संवाद भीति उत्पन्न करणारा किंवा शोकात्मक होईल; अशा प्रसंगी प्रेक्षक त्या कोणाशींच समरस होत नाहीं व म्हणूनच तिऱ्ह्याइत प्रेक्षकांच्या दृष्टीनें पाहण्यापासून जो आनंद व्हावयाचा तो त्याला होतो.

 अशा प्रसंगी सविकार समाधीची उपपत्ति डळमळू लागते. आतां नायक- नायिकांचें हृदत जाणण्याकरितां प्रेक्षकांचें तादात्म्य झालेच पाहिजे असे कोणी म्हणेल, पण हें जरी खरें असले तरी आनंद तादात्म्यानुभवापेक्षां प्रेक्षकोचित बाह्य दृष्टीनें पाहण्यामध्येंच आहे. यावर कोणी म्हणेल कीं, असला देखावा वर्णन करणाऱ्या नाटककाराच्या मनोऽवस्थेश प्रेक्षकांचें समरसत्व होतें, तर त्याला एक उत्तर एवढेच कीं केळकरांनाच स्वसमर्थनाचा हा मार्ग पसंत आहे का नाहीं याबद्दल शंका आहे. दुसरें असें कीं, नाटककाराशीं जरी तादात्म्य मानले तरी या तादात्म्यस्वरूपी अनुभवामध्ये काव्यानंदजनक असे महत्त्वाचें अंग कोणतें हें पाहिले पाहिजे आणि तें केवळ 'तादात्म्य' या शब्दानें दिग्दर्शित होतें कीं काय तें ठरविलें पाहिजे*. हपूस अंब्यापासून आनंद कां होतो तर जिव्हेचें हपूस अंब्याच्या रसाशीं तादात्म्य होतें हैं म्हणणें खरें आहे; ( कारण जिभेला रस लागल्याशिवाय चव कशी कळणार ? ) पण हपूसचा स्वाद, गोडी, तंतुरहितत्व इत्यादि गुणांचा उल्लेख न करतां सविकल्प
________

 *तादात्म्य नटार्शी, नाटकांतील पात्राशी, का तत्सूचित व्यक्तीशीं, का दुसऱ्या कोणाशीं याचा विचार आपल्या इकडील साहित्यशास्त्रांत शंकुक, भट्ट लोल्लट, अभिनवगुप्त इत्यादींनी केलेला आहे. तो तेथे द्यावासा वाटतो, पण विस्तारभयास्तव देत नाहीं.