पान:विचार सौंदर्य.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

४१


कलाकृतींच्या द्वारे इतरांस प्रतीत करून देतात. थोर पुरुषांच्या आपत्तींत, शूर योद्धयांच्या मरणांत, विधवांच्या विलापांत ( होय, विलापांत ) जें ध्येयवादित्वजन्य रम्यत्व आहे त्याचा प्रत्यय कवींनी वगैरे आणून दिला म्हणजे आपणांस आनंद होतो. हें कबूल करणे म्हणजे 'सविकल्पसमाधी'मुळे आनंद होतो ही केळकरांची उपपत्ति मान्य करण्यासारखेच दिसतें आणि मी विरोधाकरितांच विरोध करीत आहे असें कांहीं लोकांना वाटेल; पण तसे नाहीं. जें रम्यत्व, उदात्तत्व वगैरे आपणांस सामान्यतः दिसत नाहीं त्याचा प्रत्यय आपली भूमिका न सोडतां आपणांस आला म्हणजे काव्यानंद, कलानंद, वगैरेची उपलब्धि होते असें मी म्हणत आहे. पण केळकरांच्या उपपत्तीत रम्यत्वादि गुणांना आवश्यक स्थान दिलेले नाहीं. मी आपली भूमिका न सोडतां मला कविसामर्थ्यानें हिमालयदर्शनाचा लाभ झाला तर आनंद आहे. एखाद्या शेतखान्याचे किंवा उकिरड्याचें किंवा स्मशानाचें प्रत्यक्ष,किंवा काव्यवाचनाच्या द्वारें अप्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे आनंद होणार नाहीं हे उघड आहे. हां, शेतखान्याचें वगैरे वर्णन देखील एखाद- वेळेस आनंद देईल,जर तें रम्य असेल तर. भूमिका न सोडतां मला रम्य देखाव्याशीं एका अर्थी समरस होतां आलें यामुळे आनंद झाला तर त्यांत समरसत्वाचें अंग आहेच आहे, पण रम्यत्व असलेले वर्णन हें आनंदाचें प्रधान कारण आहे. भूमिकेचा आधिभौतिक अर्थ न घेतां 'स्व'त्वाची भूमिका हा जो केळकरांचा विवक्षित अर्थ त्या अर्थाच्या दृष्टीने विचार करावयाचा म्हणजे 'स्व'त्व न गमावतां मी जर शाकुन्तलामधील कण्व किंवा रघुवंशांतील अज किंवा मुक्तेश्वराच्या महाभारतांतील पांडव यांशीं समरस झालों तर आनंद होईल. एखाद्या विदूषकाशी समरसत्व पावून होणार नाहीं. तो देखील होईल; केव्हां ? तर कवीनें त्याचे विनोदाच्या वगैरे द्वारें रम्य स्वभावविशेष दाखविले असतील तेव्हां आणि अशा प्रसंगी जो आनंद होईल तो वर्णनाच्या रीतीची प्रतीति असल्यामुळे किंवा असल्या प्रसंगांत सुप्त गुप्त असलेल्या रम्यत्वाची प्रतीति असल्यामुळे आनंद होईल. केळकरांचा असाच अर्थ असेल तर मतभेदच नाहीं. पण असा अर्थ असावा असे वाटत नाहीं.

 माझ्या म्हणण्याचा एकंदरीत रोख असा आहे की, वस्तुगत रम्यत्व-