पान:विचार सौंदर्य.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४० 

विचार सौंदर्य


 साहचर्य - नियमाने किंवा अन्य कारणानें उत्पन्न होणाऱ्या सुखद स्मृति- लहरींची आपणांस नेहमींच स्पष्ट जाणीव असतेच असें नाहीं. अबोधपूर्वहि कांहीं स्मृति असतात व त्यांना चालना मिळाल्यामुळे मनुष्य आनंदित किंवा दुःखित होऊं शकतो हें येथें सांगितलें पाहिजे; पण त्याचा विस्तार करणें अनुचित होईल म्हणून आवरतें घेतों.

  (५) कोट्या वगैरे ऐकून आपणांस आश्चर्य वाटतें व अपेक्षाभंगामुळेंहि आपणांस आनंद होतो हें केळकरांनीं 'सुभाषित व विनोद' या पुस्तकांत दाखविलेंच आहे; तेव्हां त्याचें दिग्दर्शनच पुरे.

 (६) हास्यरसाच्या आनंदांत कित्येक वेळां हास्यास्पद ठरविलेल्या व्यक्तीसारखे आपण नाहीं, आपण त्याहून श्रेष्ठ आहों या जाणिवेनें आनंद होत असतो हेंहि केळकरांनी वरील पुस्तकांतच दाखविले आहे.

 [ हास्यरसाचा विचार पुढे थोडासा अधिक करावयाचा आहे म्हणून, तो येथेच सोडून देऊं.]

 (७)रम्योदात्त (Sublime) देखावे किंवा प्रसंग पाहिले असतां किंवा त्यांचे वर्णन वाचलें असतां जो आनंद होतो त्याचे कारण कॅन्ट (Kant) या तत्त्ववेत्त्यानें असें दिलें आहे की, हे रम्योदात्त देखावे व प्रसंग कितीहि सामर्थ्य - सूचक असले व त्यांपासून आपाततः भीति उत्पन्न होण्यासारखी असली तरी आनंद होतो याचें कारण असें कीं, सृष्टीच्या प्रचंड शक्तीहून आपली नैतिक शक्ति प्रचंडतर, प्रबलतर आहे अशी जाणीव तेथें उत्पन्न होत असते व या आत्माभिमानपोषक व आत्मप्रत्ययवर्धक जाणिवेपासून आनंद होत असतो. मुसळधार पावसांत पाणकोट, व बूट वगैरे घालून ऐटीने व निर्धास्तपणें चालण्यांत जो आनंद होतो तो अशाच जातीचा असतो; पण क्षुद्र क्षेत्रांत व क्षुद्र प्रमाणाचा असतो एवढेंच !

 (८) शोकरसोद्भव आनंदाचा विचार करूं लागल्यास आणखी अशाच उपपत्ति सांपडतील; पण त्या सर्वोचा विचार न करतां सहजसौंदर्यजन्य व कलासौंदर्यजन्य आनंदामधील आणखी एका घटकाचा विचार करूं या. हा घटक असा कीं, हरतऱ्हेच्या वस्तूंत, देखाव्यांत, प्रसंगांत, वगैरे जें एखादें सत्य, सौंदर्यरम्यत्व किंवा उदात्तत्व बास करीत असतें पण जें सामान्य लोकांना कळत नाहीं तें, प्रतिभावान् चित्रकार, कवि, लेखक वगैरे आपापल्या