पान:विचार सौंदर्य.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

३९


कमी होण्याचा संभव असतो हे ध्यानांत धरण्यासारखें आहे.) कवीप्रमाणे व वक्त्यांप्रमाणे आपणांमध्यें वाक्पटुत्व नसतें हैं एक त्यांच्याबद्दल आदरयुक्त प्रेम वाटण्याचें कारण आहे. काव्याचे किंवा वक्तृत्वाचें स्वतःचें म्हणून एक सौंदर्य असतेंच व तें मुख्य कारण आहेच. पण कलावन्ताच्या सामर्थ्यसहृदय- त्वादि गुणांची प्रतीति हीहि कित्येक वेळां या कारणांत भर घालते हैं मला म्हणावयाचें आहे.

 ( ३ ) कवीचा किंवा वक्त्याचा आणि आपला अनुभव जुळला व आपणांला जें पटले होतें व जें म्हणावेंसें वाटत होतें तेंच, पण आपणांला साधणार नाहीं अशा मधुर रीतीनें, त्याने म्हटलेले आपण पाहिलें म्हणजे आपल्या अपेक्षासाफल्यानें आनंद होतो व आपणहि एका अर्थी कवि किंवा वक्ता यांच्याशीं (भाषाप्रभुत्वाच्या बाबतींत नाहीं तरी) विचारांत व भावनेंत सामानधर्मे आहोत या जाणिवेनेंहि कित्येक वेळां आनंद होतो. इंग्लिश कवि पोप यानें ल्याप्रमाणें ' What was oft thought but never so well expressed' असे जेव्हां कवि किंवा वक्ता बोलतो तेव्हां तो लोकप्रिय होणें हें साहजिक आहे. केळकर म्हणतात कीं, दुसऱ्याचा अनुभव आपलासा आपण करतो म्हणून: आनंद होतो, पण आतांच्या या मीमांसेंत आपला अनुभव तोच दुसऱ्याचा आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्याचा- अनुभव असतो हे पाहून आत्मप्रत्ययांत भर पडते आणि म्हणून आपणांस त्या काव्यापासून वगैरे आनंद होतो, असें म्हटलेलें आहे !

 ( ४ ) काव्यांपासून वगैरे विचारसाहचर्याच्या योगें (through asso- ciation of ideas) अनेक प्रिय किंवा सुंदर वस्तूंची आठवण होते व ही आठवण एक प्रकारचा आनंद देते, हें एक चौथें कारण. कादंबऱ्या, निबंधांत वगैरे उपमादि अलंकार असतात ते अर्थविशदीकरणार्थच असतात असें नाहीं. उपमादिकांच्या द्वारें फुलें, स्त्रिया, वगैरेंची आठवण झाली तर — या वस्तु केव्हांहि प्रिय व सुंदर म्हणून ( त्यांच्याशीं सविकल्प समाधि होते म्हणून नव्हे ) आपणांस त्यांच्या स्मृतींमुळे आनंद होतो. सुंदर वस्तूंचीच स्मृति मला विवक्षित नाहीं, तर सुंदर वचनें, विचार, भावना, प्रसंग वगैरेंची देखील स्मृति जर काव्यापासून झाली तर तें काव्यहि रमणीय वाटण्यास हें एक कारण होऊं शकतें.