पान:विचार सौंदर्य.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

३७


संशय उत्पन्न केलेला आहे ! ] हा प्रश्न बाजूला ठेवून स्थायीभाव सचेतन सृष्टीवर व अचेतन सृष्टीवर अधिष्ठित असण्यावर रस व अलंकार यांमधील भेद ठरविणें कितपत योग्य आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूं या. खरें सांगावयाचें म्हणजे या बाबतींत माझें मन मला असे सांगतें कीं, केळकरांचा अर्थ मला चांगला समजला नसावा, किंवा त्यांच्या लेखनांत ढिलेपणा असावा. कारण रस हे अंतःकरणाची अवस्था सुचवितात व 'अलंकार' हे कांहीं अंतःकरणाची अवस्था सुचवीत नाहीत, ही शाब्दिक शंका सोडून दिली तरी अलंकारापासून उत्पन्न होणारी अवस्था व या संज्ञेनें सूचित होणारी मनोsवस्था( किंवा वाटल्यास तजनक वाक्प्रबंध) यांतील भेद अचेतन व सचेतनत्वावर अवलंबून कसा आहे हे कळणे कठीण आहे. कारण निर्जन अरण्य किंवा श्मशान यांच्या सरस वर्णनानें रसोत्पत्ति होऊं शकते व उलटपक्ष सचेतनाला सचेतनाची उपमा दिली ( उदाहरणार्थ, विष्णुशास्त्री यांना मराठी भाषेच्या बाबतींत शिवाजीची उपमा दिली किंवा टिळकांना रामदासाची उपमा दिली ) तरी सचेतनत्वामुळे अलंकार उत्पन्न होत नाहीं असेंहि नाहीं. 'अलंकाराचे स्थायीभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित असतात' या केळकरांच्या वाक्यांतील 'हि' या अक्षरावर जोर दिला तरी असमर्थनाचे बाबतींत विशेष भर पडेल असे वाटत नाहीं म्हणून, व गौण मुद्दयाचा अधिक विस्तार करणें युक्त नव्हे म्हणून मुख्य प्रश्नाकडे वळू या.

 माझ्या मतें अलंकारांपासून जो आनंद होतो त्यांत अनेक पदार्थाचें एकाच वेळी आकलन होतें हा एक घटक असला तरी हा घटक गौण आहे. भूगर्भशास्त्राचे किंवा रसायनशास्त्राचे किंवा कोठल्याहि शास्त्राचें अध्ययन चाललें असतां देखील अनेक पदार्थाचा एकदम आनंद घेतां येतो, पण तेथें कलात्मक आनंद नसतो, या एका उदाहरणावरून सुंदर अलंकारापासून किंवा कोणत्याहि कलात्मक वर्णनापासून जो आनंद होतो तो त्या अलंकाराच्या किंवा कलात्मक वर्णनाच्या सौंदर्यापासून होतो, आकलित पदार्थांच्या किंवा व्यक्तींच्या संख्येवर नसतो किंवा एकसमयावच्छिन्न अनुभवावर नसतो हैं ध्यानांत येईल.

 काव्यानंद काय किंवा कोणताहि कलात्मक अथवा सहजसौंदर्यजन्य