पान:विचार सौंदर्य.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

३५

 आतां अधिक विस्तार न करतां काव्यानंदांतील सविकल्पत्व मान्य करून सविकल्प 'समाधी' पासून आनंद होतो हैं जें केळकरांचें म्हणणें त्याचा विचार करूं या. केळकर म्हणतात, वाचक आपली भूमिका न सोडतां मनाप्रमाणे दुसऱ्या भूमिकेवर किंवा भूमिकांवर संक्रमण करतो व या अर्थानें जगाचें आकलन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अल्पांशानें पुरी होते म्हणून त्याला आनंद होतो आणि जितक्या अधिक भूमिकांशीं त्यांचें तादात्म्य होईल ( अर्थात् सविकल्प तादात्म्य होईल ) तितका त्याला अधिक आनंद होईल; आतां सर्व जगाचें आकलन करून घ्यावें अशी जीवाची सुप्त आणि नेणिवेंतील तरी महत्त्वाकांक्षा असते हें खरें आहे. त्याचप्रमाणें हें आकलन झाले असतां आनंद होतो हेंहि खरें आहे. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजला, किंबहुना एखाद्या वस्तूचें नांव जरी समजलें, तरी देखील आनंद होतो असा अनुभव आहे. इतके दिवस अज्ञात असलेल्या गोष्टीचें आकलन झालें या जाणीवेनें जो आनंद होतो तो विद्यानंदाचा एक घटक आहे यांत शंका नाहीं. कलाजन्य आनंदांत देखील हा एक घटक आहे हेंहि कबूल करण्यास हरकत नाहीं. पण हा घटक अगर्दी गौण आहे आणि कलानंदाचा तो व्यवच्छेदक विशेष नव्हे.

 आपली भूमिका न सोडतां दुसऱ्या भूमिकेशीं समरसत्व होणें शक्य आहे व यांत आतां वर म्हटल्याप्रमाणें एक प्रकारचा आनंद आहे, हें कबूल केलें तरी कलानंद किंवा काव्यानंद सविकल्प समाधीपासून उत्पन्न होतो या उपपत्ती- वर अनेक आक्षेप घेतां येण्यासारखे आहेत. केळकरांनीं कण्वाचें व शकुंतलेचें उदाहरण घेऊन आपली भूमिका न सोडतां आपण कण्वाशी किंवा शकुंतलेशी समरसता पावतों म्हणून आनंद होतो असे म्हटले आहे; आतां मला असा प्रश्न पडतो कीं, एखाद्या गाईचें व तिच्या वासराचें सुंदर दृश्य पाहून किंवा रंगविलेलें रंगेल चित्र पाहून किंवा रेखाटलेले शब्दचित्र वाचून मला जो आनंद होतो तो गाईशीं तादात्म्य पावून का वासराशीं ? याच्याहून दुसरा व अधिक कठिण प्रश्न असा कीं, एखादे वेळेस प्रातःकाळीं टेंकडीवरून नदीकांठचा रम्य देखावा पाहून मी आनंदित होतों तो नदीशीं तादात्म्य पाहून, का झाडाशी, का टेंकडीशी, का आभाळाशी, अनेकरंगी ढगांशीं ? येथे कोणी उत्तर देईल कीं, आपण सृष्टिकार्त्यांशी क्षणैक तादात्म्य