पान:विचार सौंदर्य.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

३३

सविकल्प समाधीच्या उपपत्तीमुळे तादात्म्याची चुकीची उपपत्ति मागे पडली आहे, ही चांगली गोष्ट झाली. काव्यानंद हा विशिष्ट प्रकारचा आनंद आहे. आणि त्याचें पृथक्करण करून त्याचे स्वरूपवर्णन करणे व कारणमीमांसा करणें हें तत्त्वदृष्ट्या जरूरीचें आहे व वाङ्मयदृष्ट्या मनोरंजक आहे हे केळकरांनी या प्रश्नाला आपल्या अध्यक्षीय भाषणांत महत्व देऊन लोकांच्या नजरेस आणले आणि या प्रश्नाकडे रसिकांचे लक्ष वेधले हा मराठी वांग्मायाचा मोठाच फायदा झाला आहे.

 आतां कोणतीहि उपपत्ति निघाली म्हणजे ती सर्वांनाच पसंत पडेल असें नाहीं. अर्थात् सविकल्प समाधीची उपपत्ति मला किंवा इतरांना कांहीं बाबतींत पसंत पडत नाहीं यांत आश्चर्य नाहीं. माझा मतभेद थोडक्यांत व विरोधाभासात्मक शब्दांत सांगावयाचा म्हणजे मी असें म्हणेन कीं, केळकरांच्या सविकल्पत्वाला मनांत कोणताहि विकल्प न ठेवतां मी मान्यता देतों, पण त्यांच्या उपपत्तीतील 'समाधीपासून आनंद होतो' या म्हणण्याला जलसमाधि देऊं इच्छितों ! काव्य करतांना कवि, काव्यरसास्वाद घेतांना रसिक, हा विषयाशी पूर्ण तादात्म्य पावत नाहीं, तर त्याची समाधि सविकल्प असते, हें मला पूर्णपर्णे मान्य आहे. कवीनें, वक्त्यानें, कलाकुशलानें, रसिकानें स्वतःला विसरावयाचें खरें, पण पूर्णपणे विसरावयाचें नाहीं. नैतिक क्षेत्रांत जसें स्वार्थ विसरणें हें ध्येय आहे, पण उच्च अर्थाचा जो 'स्व' त्याचा अर्थ विसरावयाचा नाहीं, तर उलट 'आत्मज्ञान ' करून घेणें हें ध्येय असतें, त्याप्रमाणेच रसास्वादाच्या बाबतींत देखील रसिकानें एका अर्थी स्वतःला विसरावयाचें आहे व एका अर्थी एक विशिष्ट व ब्रह्मानंदतुल्य अलौकिक आनंद देणाऱ्या स्वानुभवाचा उत्कर्ष साधाTवयाचा आहे. काव्यात्मक आनंदांत समरसत्व असतें, तादात्म्य असतें, पण हें वाच्यार्थानें घ्यावयाचें नसतें तर तें 'अलौकिक' असते आणि त्यांत सविकल्पत्व असतें हा मुद्दा जितका लोकांच्या ध्यानांत यावा तितका येत नाहीं.

 शोकरसाचा आनंद घेतांना पूर्ण तादात्म्य पावल्यास आपणांस शोक होईल; शोकरसाचा आनंद होणार नाहीं. शोकगंभीर नाटकांमध्ये ( Tragedies मध्यें ) आनंद होतो तो तन्मयता अपूर्ण असते म्हणून होऊं शकतो, पूर्ण तन्मयता झाल्यास शोकरस उत्पन्न न होतां शोक उत्पन्न वि. सौं....३