पान:विचार सौंदर्य.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० 

विचार सौंदर्य

साखर पडेल; पण ज्याचा मूळ हेतु नीतिबोध नाहीं तें वाङ्मयच नव्हे हें म्हणणें यथार्थ नाहीं,.. शुद्ध निरपेक्ष आनंद हाच कलेचा हेतु व तेंच फळ होय. "

 शेवटल्या वाक्यांतील 'आनंद' या शब्दामागें 'शुद्ध' हें विशेषण लावलेले आहे तें फार महत्त्वाचें आहे. कला ही नीतीची दासी नसेल, कलेनें आत्म- प्रसादाकरितां स्वतःच्या मनाला 'पूत' वाटेल तें करावें व नीतीची फाजील प्रतिष्ठा ठेवूं नये हें खरें असेल, पण तिनें 'मनःपूत ' वागावें व नीतीचा खून करावा (किंवा इतकी कडक भाषा नको असल्यास) तिनें औचित्यभंग करावा असा मात्र याचा अर्थ नव्हे. औचित्य सर्वांनींच पाळले पाहिजे. अश्लील व श्लील यांबद्दल वसन्तव्याख्यानमालेत बोलतांना हें केळकरांनी सुंदर रीतीनें सुस्पष्ट केलें होतें. चारचौघांत जे वाङ्मय वाचण्यास संकोच वाटेल किंवा जें चित्र पाहण्यास अवघड वाटेल तें अनुचित. आतां संकोच वगैरे जें कांहीं आहे तो सगळा संवईचा आहे असें कांहीं लोक म्हणतील. लोकांच्या मनाची, संबईमुळें का होईना, विशिष्ट मनोघटना झाली असेल तर ही घटना कायम आहे तोपर्यंत त्यांना वाटणारें अनौचित्य टाळलेलें बरें. काव्याकडे काव्यदृष्टीनेंच पहावें असें केळकर म्हणतात त्या वेळेस नैतिक अनौचित्याकडे दुर्लक्ष करावें असा त्यांचा भावार्थ नाहीं. काव्यात्मक कलेनें व इतर कलांनीं मनाची लाज नसली तरी जनाची लाज ठेवावी असेंच ते म्हणतील. आतां नीतिअनीतिविषयक विचारसरणी व मूलभूत सिद्धान्त यांविषयींच जर पूर्ण मतभेद असेल तर काय करावयाचें याचा विचार केळकरांनीं कोठें केलेला दिसत नाहीं. पण त्यांच्या लेखांचें एकंदरींत धोरण असें दिसतें कीं, नीतीनें नाकानें कांदे सोलू नयेत व कलेनें नीतीला कोपऱ्यांत बसवूं नये. कला- विषयांत नीतीनें लुडबूड करूं नये हें खरें असले तरी: अनीतीची दुर्गंधी आपल्या क्षेत्रांत येणार नाहीं अशी काळजी कलेनें घेणें हें औचित्याला . धरून नाहीं काय, असें केळकर विचारतील. 'कुळकर्णी लीलामृता'सारख्या पुस्तकांतील किंवा प्रभाकरादिकांच्या लावण्यांतील सौंदर्य त्यांना समजतें. पण पहिलें सौंदर्य असत्यानें शबलित व दुसरें नैतिक अनौचित्यानें दूषित, म्हणून तीं शुद्ध आनंद देऊं शकत नाहींत असे ते म्हणतील. रघुवंशांत अजराजाच्या सुराज्यव्यवस्थेचें श्रृंगारिक भाषेंत जें वर्णन केले आहे त्याचा रसास्वाद ते