पान:विचार सौंदर्य.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८ 

विचार सौंदर्य


व्याख्यानम् अशा तऱ्हेचें झालें ! किंवा ब्रह्मविषयक गहन गोष्टी सोडून व्यावहारिक गोष्टीविषयीं बोलावयाचें म्हणजे एखाद्या निष्कपटी विद्यार्थिनीनें भाबडेपणानें भलताच प्रश्न विचारला असतां गुरु जें मौन स्वीकारतो तेंहि “गुरोस्तु मौनं व्याख्यानम् 'अशा तऱ्हेचें असतें. अशा प्रकारच्या मौनात्मक व्याख्यानांतहि 'ध्वनि' असतो आणि तो रसोत्पादक असतो यांत शंका नाहीं.

 तात्पर्य, कवींनी, नाटककारांनी, कादंबरीकारांनीं वगैरे असे प्रसंग वर्णिले आहेत कीं तेथें साध्या शब्दांनीं देखील उच्चतम रसोत्पत्ति झाली आहे. यापुढे जाऊन असेंहि म्हणता येईल की, त्या प्रसंग अलंकारिक भाषा कोणीं वापरली आहे अशी कल्पना केली तर तेथें रसहानि झाली असती !

अलंकारादिकांची काव्याला आवश्यकता नाहीं असें केळकर कबूल करतात, पण त्यांचा स्वाभाविकपणेंच सालंकार वैदग्धाकडे व लालित्याकडे कल असल्यामुळे ते त्यांना जें महत्त्व देतात तें मला पसंत नाहीं. (हें फाजील महत्त्व देण्याचें एक कारण असे दिसतें कीं, रस व अलंकार यांत तत्त्वतः ते भेद मानीत नाहीत, - अलंकार हा रसाचाच जणूं कांहीं प्रकार आहे असे ते मानतात. "रस व अलंकार यांच्या स्वरूपांत वास्तविक इतकाच फरक कीं, रसाचे स्थायिभाव जीवसृष्टीच्या भावनांवर अधिष्ठित असतात व अलंकाराचे स्थायिभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित होऊं शकतात. ") असो. अधिक विस्तार नको, खरें म्हटले म्हणजे वर निर्दिष्ट केलेल्या प्रसंगांसारखे प्रसंग वर्णन करून स्वाभाविक रसोत्पत्ति करण्याकडे लेखकांची अधिकाधिक प्रवृत्ति व्हावी म्हणूनच या मुद्दयाचा एवढा तरी प्रपंच केला, बाकी तत्त्वतः आमचा मतविरोध आहे असे मुळींच नाहीं.

 काव्यानंदाला कारणीभूत वाग्विलास असतो, मग हा विलास प्रधानत्वें करून भावनारम्यत्वमूलक, कल्पनावैभवमूलक किंवा बुद्धिवैभवमूलक असो. वाग्विलास हा अलंकारांच्या काय व रसांच्या काय मुळाशी असतो. या दृष्टीनें रसाचें व अलंकाराचें मी एकरूपत्व मानूं शकेन. तसेंच भावनांचा, कल्पनांचा व बुद्धीचा परस्परांशीं अत्यन्त निकट संबंध असतो, इतका कीं, तीं एकमेकांच्या अंगभूत आहेत, या अर्थानेंहि मी रसाचें व अलंकाराचें एकरूपत्व मानूं शकेन. पण सामान्य दृष्टीने पाहतां रस व अलंकार यांमध्यें जो भेद मानिलेला आहे तो महत्त्वाचा आहे व त्याकडे दुर्लक्ष करणें युक्त नव्हे म्हणून आणि काव्यादि