पान:विचार सौंदर्य.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६ 

विचार सौंदर्य


आहेत असें मान्य करण्यासारखे आहे. तालबद्ध रचना,छंद,अनुप्रास, यमकें,अर्थालंकार,वक्रोक्ति,व्यंग्योक्ति इत्यादींमुळे भाषणाला किंवा लेखनाला शोभा येते हैं मला कबूल आहे. यांचें पुष्कळ वेळां कवींना बंधन वाटत नाहीं, तर स्वाभाविकपणेच असले सालंकार व मधुर वाक्प्रबंध त्यांना सुचतात हेंहि कबूल. यमकादिकांचें बंधन असतें म्हणूनच कांहीं वेळां कवींना वगैरे डोकें खाजवावें लागतें, व त्यांच्या कल्पनाविलासाच्या व बुद्धि- विलासाच्या सामर्थ्याला चालना मिळते, त्यांची स्वतःची व वाचकांदिकांची तद्विषयक हौस पुरविली जाते आणि उभयतांना सात्त्विक काव्यानंदाचा लाभ होतो हे सर्व मला मान्य आहे. काव्य म्हटले म्हणजे तें भावनाविलासात्मकच पाहिजे असा माझा आग्रह नाहीं; बुद्धिविलास व कल्पनाविलास यांचें मला इतरांप्रमाणेंच कौतुक वाटते आणि तजन्य आनंद लुटतांना मला कमीपणा किंवा लाज वाटत नाहीं. शाब्दिक कोट्यांचा देखील मी भोक्ता आहें, मग त्याहून उच्चतर असलेल्या अलंकारादिकांनी माझें मन प्रफुल्लित होतें हैं कबूल करण्याची जरूर नाहीं. कल्पनावैभव, शब्दप्रभुत्व इत्यादिकांनीं उत्पन्न झालेली आश्चर्य-चकितता, कौतुक, इत्यादींनीं विशिष्ट अशी एक संमिश्र भावना असते व भावना ही सात्त्विक आणि उच्च स्वरूपाची असूं शकते अर्से केळकरांनीं जें मार्मिकपणे दाखविलें आहे तें सर्व यथार्थ आहे. कोणत्याहि बौद्धिक व्यापाराशेजारीं तद्विशिष्ट भावना नियमानें असतेच हें मानसशास्त्रीय तत्त्व या संदर्भात ध्यानांत धरावें. सर्वच काव्यें भावनाविलासात्मक असतात असें या अर्थाने म्हणतां येईल; पण अशांचें प्राधान्य पाहून नांवें ठरविलीं तर सामान्यतः ज्यांना भावनाविलासात्मक काव्यें म्हणतात त्यांतील उच्चतम काव्यांना यमकें, अलंकार, इत्यादींची आवश्यकता नाहीं, तीं अंगभूत नाहींत, तर अनुषंगानें, गौण रीतीनें व अनियमपूर्वक येणारी आहेत असें मला म्हणावयाचें आहे. अलंकारादिकांच्या विरुद्ध लिहिणारे लॉक ( Locke ) प्रभृति लोक देखील अलंकारांचा उपयोग करतात असें केळकर म्हणतात. यावरून एवढेच सिद्ध होईल कीं, त्यांचा उपयोग करणें मनुष्यमात्रास आवडतें, - त्यांची योग्यता उच्चतम आहे हें असल्या उदाहरणांनी सिद्ध होत नाहीं. शुद्ध व उच्चतम विनोद शब्दनिष्ठ किंवा कल्पनाविलासात्मक नसतो किंवा बुद्धिविलासात्मक नसतो, तर प्रसंगनिष्ठ असतो असें अलीकडे म्हणूं