पान:विचार सौंदर्य.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

24 

विचार सौंदर्य


उपमा या हंड्याझुंबरांतील मेणबत्यांप्रमाणे लेखनमन्दिर प्रकाशित करतात किंवा सुवासिक पुष्पांप्रमाणें तें सुगंधयुक्त करतात किंवा सनईच्या सुरांप्रमाणे गूढ आणि कोमल भावना जागृत करतात आणि श्रोत्यांची मनें प्रसन्न व प्रफुल्लित करतात. पण कीर्तनाचें मुख्य काम विद्वान् हरदासालाच केले पाहिजे. उदा- हरणार्थ, केळकरांची वरील उपमाच व्या. साहित्यचर्चा म्हणजे फलाहाराच्या वेळच्या शिळोप्याच्या गप्पा नव्हेत, तर तद्विषयक एक मोठे महत्त्वाचें शास्त्र आहे, ती एक कलाहि आहे; इतकी कीं कलाकृति जशी व जितकी सुंदर असते तितकी कलाविषयक टीकाहि असूं शकते; हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वरील उपमेंत सूचित होत नसला तरी पण काव्यचर्चेवरचा पूर्वनिर्दिष्ट आक्षेप वाचून किंवा ऐकून मनांत जो प्रतिकूल ग्रह उत्पन्न झालेला असतो त्याची तीव्रता केळकरांनी दिलेल्या वरच्यासारख्या उपमांनी कमी होत नाहीं काय ? अर्थात् होतेच. तात्पर्य, तर्कावर अधिष्ठित असलेली केळकरांची वाङ्मयविषयक चर्चा विद्वत्त्व, विवेकित्व, विनोदित्व इत्यादि बहुमोल आंतरसद्गुणांनी युक्त असल्यामुळे व उपमादि अलंकारांनीं सुशोभित असल्यामुळे ती मधुर कलाकृतीप्रमाणें रसिकांस आदरणीय व सेवनीय वाटते यांत नवल नाहीं.

 असो. एवढी प्रस्तावना करून केळकरांच्या वाङ्मयविषक चर्चेतील एकेका विषयाकडे आतां मी वळतों.

 वाङ्मयाचा पृथक्करणात्मक विचार करूं लागल्यावर गद्य व काव्य हा भेद प्रथम ध्यानांत येतो. केळकरांनीं उज्जयिनी येथें नुकतेंच जें भाषण केलें त्यांत या प्रकारांचा भेद दर्शविण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. "माझें लेखन मुख्यतः विवेचनात्मक व तर्कनिष्ठ असतें असे मला वाटतें. म्हणून मी गद्य- लेखक या सदरांतच पडेन" असें म्हणून विवेचन व तर्कनिष्ठता हे गद्याचे व्यवच्छेदक विशेष होत हे त्यांनीं सुचविलें आहे हे बरोबर आहे. गद्य व काव्य हा भेद वृत्तबद्धतेचा अभाव किंवा अस्तित्व ह्या बाह्यलक्षणांवर अवलं बून नसून लेखनाच्या परिणामावर अवलंबून आहे हें ते जाणून आहेत. ते सदर व्याख्यानांतच म्हणतात की, "कित्येक लेखक गद्यच इतकें सरस लिहितात व कित्येक लेखक पद्यच इतकें नीरस लिहितात कीं संसारांत अनेक वेळां अनुभवाला येतें त्याप्रमाणें दादाला अक्का व अक्काला दादा म्हटले तर तें शोभेलहि. पण जनरूढीला अनुसरून आणि 'प्राधान्येन व्यपदेशाः "