पान:विचार सौंदर्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

२३


केळकरांच्यामध्यें ही आवड आणि शक्ति आहे. त्यांनी वाङ्मयसागरावरून अनेक ठिकाणांहून उड्डाण केले आहे व वाङ्मयसागरांत ते अनेक ठिकाणीं डुंबलेले व रममाण झालेले आहेत, इतकेच नव्हे तर वाङ्मयसागराच्या बुडाशीं जाऊन आणि तेथें डोळे उघडून पाहून ते तळ घेऊन आलेले आहेत !

 त्यांची वाङ्मयचिकित्सा वाचनीय होण्याचे आणखी एक कारण असें कीं, त्यांची वाणी रसाळ आहे. साहित्यशास्त्रांतला कसलाहि रुक्ष विषय असो किंवा सूक्ष्म भेद असो, त्याचें पृथक्करण व विवेचन करतांना ते इतके रंगतात व सांगायचें तें इतकें खुलवून सांगतात कीं, तें ऐकतांना किंवा वाचतांना मनुष्य रंगून जातो आणि एका विशिष्ट कलात्मक आनंदांत तो डोलू लागतो. शुभ्र प्रकाशकिरणाचें पृथक्करण केले असतां सूक्ष्मतम पण रुक्ष तत्त्व हात न येतां सात रंग दिसूं लागतात ते त्या किरणाच्या स्वभावगुणामुळें; पण केळकरांनीं सूक्ष्म तत्त्वांचे पृथक्करण केले असतां तेथें सप्तरंगात्मक जी शोभा दिसते ती मात्र यांच्या कलाकुशलतेमुळे होय !

 सौंदर्याचें पृथक्करण व विच्छेदन (Dissection ) करूं नये, कारण विच्छेदन म्हणजे विध्वंसन ( We murder to dissect ) असें वर्ड्सवर्थ म्हणतो, आणि फुलांच्या पाकळ्या तोडून टाकणाऱ्या मुलासारखी वृत्ति असलेल्या लोकांच्या बाबतींत हें खरेंहि आहे. पण केळकरांसारख्यांचें विच्छेदन हें देवांचें शस्त्रवैद्य अश्विनीकुमार यांच्या विच्छेदनासारखें असून त्यामुळे विध्वंसन होत नाहीं तर मृतकल्प झालेल्या व शब्दांत मात्र जिवंत राहिलेल्या शास्त्रीय तत्त्वदेहास जणूं कांहीं संजीवनीमंत्रयुक्त हस्तस्पर्शाचा लाभ होऊन त्यांत जीवनकला उत्पन्न होते व तें नाचूं बागडूं लागतें आणि आपलें मन आकर्षण करून घेतें. उदाहरणार्थ, काव्यादिकांचा आस्वाद न घेतां त्यांची चर्चा करणें वेडेपणाचें आहे या आक्षेपाबद्दलच त्यांनीं एक ठिकाणी असें म्हटले आहे कीं, फलाहार करतांना द्राक्षादि फलांचा वगैरे आहार हा जरी प्रमुख हेतु असला तरी त्या वेळीं हीं फळें कोठून आलीं, त्यांचे प्रकार किती, प्रत्येकाची चव काय, वगैरे गोष्टींबद्दल चर्चा केली असतां फलाहारांत अधिक मौज उत्पन्न होणार नाहीं काय ? काव्यानंदाचा उपभोग न घेतां शुष्क वाटणाऱ्या काव्यचर्चेबद्दल जो आक्षेप घेण्यांत आला त्याची धार या अशा उपमांमुळे लगेच बोथट होते. उपमांनी अर्थात् सगळें काम होत नाहीं. चांगल्या