पान:विचार सौंदर्य.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

२१

प्रत्येक शब्दाला महत्त्व येतें ही गोष्ट खरी असली तरी ती सध्यां माझ्या मनांत नाहीं. मी हा लेख लिहितांना राजकीय दृष्टि अजिबात वगळलेलीच आहे. केळकर यांची वाङ्मयमीमांसा मला विशेष मननीय वाटते ती त्या मीमांसेच्या राजकीयेतर व स्वतःसिद्ध गुणांमुळेंच होय. एक तर वर दर्शविल्याप्रमाणे केळ- करांची वाङ्मयक्षेत्रांत "आधी केलें मग सांगितलें " अशा प्रकारची स्थिति आहे. ते केवळ टीकाकार नव्हेत, तर कथा-नाटक- निबंधादि वाङ्मय स्वतः लिहून नांव मिळविलेले टीकाकार आहेत. काव्यहि त्यांनी लिहिलेले आहे व तें उच्चतम दर्जाचें नसले तरी त्यांत बरेच गुण आहेत. चरित्र, ऐतिहासिक निबंध, प्रवासवर्णनें, वगैरे अनेक प्रकारचे लेख त्यांनी स्वत: लिहिलेले आहेत, अर्थात् वाङ्मय-निष्पत्तीसंबंधी व वाङ्मयकलेसंबंधीं त्यांना स्वानुभवावरून बोलण्यासारखें पुष्कळ आहे आणि अनुभवाच्या बोलाची केव्हांहि किंमत विशेष असणार.

 दुसरी गोष्ट अशी कीं, ते बहुश्रुत आहेत. त्यांनी मराठी, इंग्रजी व संस्कृत मिळून जितके ग्रंथ वाचले असतील तितके वाचलेले लोक फारच विरळा; महाराष्ट्रांत तरी फारच थोडे. (माझ्या डोळ्यांपुढे चिंतामणराव वैद्यच तेवढे सध्यां उभे राहत आहेत. ) कायद्यासंबंधी व वर्तमानपत्रांतील हरतऱ्हेच्या विषयासंबंधीं जीं पुस्तकें व जे लेख वाचले असतील ते सोडून दिले तरी शेक्स- पिअर, गोल्डस्मिथ, जॉन्सन, अॅडिसन, बर्क, रस्किन, कार्लाइल, गटे, लेसिंग, इत्यादि जुने तसेच अलीकडचे बिरेल, शॉ, गॅल्सवर्दी, गार्विन, ब्रेडले वगैरे पाश्चात्य लेखक त्यांनीं इतके वाचले आहेत की त्यांची यादी सहज छापील पांच दहा पानें होतील इतकी लांबेल. मराठींतील बरेच जुने कवि, आधुनिक मराठींतील बहुतेक सर्व गद्य लेखक व बरेचसे कवि यांचा त्यांना चांगला परि- चय आहे. संस्कृतमधील बहुतेक प्रसिद्ध नाटकें व साहित्यशास्त्रावरील बरेचसे ग्रंथ ह्रीं त्यांनीं अभ्यासिलीं आहेत. आणि तीनहि भाषांतील हे ग्रंथ मार्मिक- पणें आणि रसास्वादाच्या दृष्टीनें वाचलेले आहेत, केवळ परीक्षेकरितां किंवा विद्वत्प्रदर्शनाकरितां नव्हे.

 त्यांच्या रसिकत्वाच्या जोडीला त्यांचा स्वभावजन्य समतोलपणा आणि त्यांची सविवेकता हे गुण त्यांना लाभले आहेत. शिवाय केसरीचे संपादक व राजकीय पुढाऱ्यांपैकी एक या नात्यानें त्यांचा अनेक व अनेकविध लोकांशीं