पान:विचार सौंदर्य.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२० 

विचार सौंदर्य


पुष्पांनीं प्रफुल्लित झालेला पाहावयाचा असल्यास केळकरांचा त्याला हस्तस्पर्श करवावा म्हणजे इष्ट हेतु साध्य होईल ! कविसंकेताप्रमाणें पाहतां कांहीं विशिष्ट वृक्षासंबंधींच युवति या प्रभावशाली होतात; पण केळकरांचें प्रभावशालित्व सर्वगामी आहे; केळकर सिमल्याचें वर्णन करोत किंवा विलायतेहून पत्रे पाठवोत; इतिहास-संशोधनाबद्दल चर्चा करोत किंवा 'मराठे व इंग्रज' यांच्या संबंधाचें निरीक्षण करोत; निर्यमक कवितेबद्दल लिहोत किंवा टिळकांच्या आठवणींना प्रस्तावना लिहोत, 'तोतयाच्या बंडा 'वर नाटक लिहोत किंवा 'माझी आगगाडी कशी चुकली' याविषयीं लघुकथा लिहोत; ' संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन' करूं पाहोत किंवा वर्तमानपत्रांतील जाहिरातींचें महत्त्व वर्णन करूं लागोत, - जो विषय या साहित्यभक्ताच्या व रसज्ञ ज्ञानयोग्याच्या आणि वाङ्मयकलापटू कर्मवीराच्या हातीं येईल त्यांत बहुश्रुतता, वैदग्ध्य, माधुर्य, सालंकारत्व, रसप्राचुर्य, रसलोलुपता इत्यादि गुणांची भर पडून तो खुलून दिसावयाचाच व फुलून जावयाचाच.

 त्यांच्या लिखाणाची विविधता व सुरम्यता पाहून त्याला एखाद्या मोठ्या उद्यानाची किंवा कलात्मक वस्तुसंग्रहाची उपमा द्यावीशी वाटते. या विस्तृत उद्यानाचें किंवा कलात्मक वस्तुसंग्रहाचे निरीक्षण किंवा परीक्षण करावयाचें म्हटले म्हणजे राजकारणांतील 'फोडा आणि झोडा' या भेदनीतीतत्त्वाचा अंगीकार करून एकेका भागाचा एकेकदा समाचार घेतला पाहिजे. आणि या दृष्टीनेंच प्रस्तुत लेखांत केळकरांच्या सर्व वाङ्मयकलाविलासासंबंधी न लिहितां त्यांनीं अंतर्मुख होऊन वाङ्मयकृतींबद्दल, म्हणजे त्यांच्या स्वरूपाविषयीं, तत्त्वांविषयीं वगैरे जें बरेंचसे लिहिलेले आहे त्यापैकीं कांहींचें थोडक्यांत सारांश रूपानें वर्णन करून त्यांतील गुणदोषांचें दिग्दर्शन करावयाचें आहे. प्रस्तुत लेखांत त्यांच्या काव्यांबद्दल चर्चा येणार नाहीं, तर काव्यांविषयीं त्यांनीं काय लिहिले आहे याविषयीं येईल. त्यांचे गद्यपद्यप्रबंध नानाविध व रसपूर्ण आहेत; पण त्या सर्वांविषयीं न लिहितां गद्यपद्याविषयी, यमकांविषयी, काव्याविषयीं, रसास्वादाविषयीं वगैरे त्यांनीं जें लिहिलेलें आहे, त्याविषयीं या लेखांत विवेचन करावयाचें आहे.

 केळकरांच्या वाङ्मयमीमांसेला विशेष महत्त्व अनेक दृष्टींनीं आलेले आहे. राजकारणांत बरेंच महत्त्व असलेल्या 'केसरी'चे ते संपादक होते म्हणून त्यांच्या