पान:विचार सौंदर्य.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

विचार सौंदर्य


युक्तिवादांतील, भाषेतील, कोट्यांतील वगैरे सौंदर्य पाहून तद्विषयक रसास्वाद घेण्यांत तर ते विशेष रममाण झालेले आपल्या कल्पनेला दिसतील. निदान माझ्या कल्पनेला ते तसे दिसतात. आपण प्रतिपक्ष्यावर केलेला वार कारीगर व होतां तो निसटला हें पाहून टिळकांना जें दुःख वाटलें असतें तें 'आपण वार किती सफाईदार केला होता ' या जाणीवेनें विशेष कमी झाले नसतें.. त्यांच्या अंगीं बाणलेल्या गीतोपदिष्ट तत्त्वज्ञानानें तें जितकें कमी झाले असतें तितकें तें वरील जाणिवेनें कमी झाले नसतें. केळकरांचा वार प्रतिपक्षानें चुकविला तर त्यांनाहि दुःख होईलच, पण गीतोपदिष्ट तत्त्वज्ञानापेक्षां स्वकीय वाक्पटुत्वाच्या जाणिवेनें तें त्यांना अधिक सह्य होईल. किंबहुना मी असेंहि म्हणूं शकेन कीं, केळकर हे निसटून जाणान्या प्रतिपक्ष्याच्या वाक्कौशल्याची तारीफहि करूं शकतील. क्रिकेटच्या भाषेत बोलावयाचें म्हणजे आपण फेंकलेल्या चेंडूमुळे शत्रूची बुइकेट जरी मिळाली नाहीं, किंबहुना त्यानें तो चेंडू बाऊंडरीवर दवडला, तरी देखील ते स्वतःचा चेंडू चांगला फेंकला गेला असल्यास त्यांतील कौशल्याचें व असा चेंडू तटविणाऱ्या किंवा मारणाऱ्या शत्रूच्या शहामतीचें क्षणभर कौतुकच करतील व मागूनहि न लाजतां याबद्दल गप्पागोष्टी करतील. ' कुलकर्णी-लीलामृतांत ' रा. पाटील यांनी प्रत्यक्षतः कुळकर्ण्यांवर व अप्रत्यक्षतः ब्राह्मणवर्गावर जो ताशेरा उडविलेला आहे त्या- वरील केळकरांचा लेख वाचला म्हणजे आपली वुइकेट घेणाऱ्या प्रतिपक्ष्याच्या कौशल्याची ते तारीफ करूं शकतात हे कळून येईल. अच्युत बळवंत कोल्हटकर यांचें व केळकरांचें बरेंचसें बिनसलें असतां देखील केळकर हे अच्युत- रावांच्या लेखनशैलीची व वाक्पटुत्वाची प्रांजलपणें स्तुति करीत, यावरूनहि हाच मुद्दा सिद्ध होतो कीं, केळकरांना वाङ्मयात्मक विलास इतके प्रिय आहेत की, या विलासांच्या निमित्तानें शत्रु त्यांना घाव मारूं लागला तर बचाव करतां करतां ते घाव घालणाऱ्याच्या चतुराईचें मनांत कौतुक करूं शकतात व योग्य वेळीं जनांतहि मनांतलें कौतुक बोलून दाखवूं शकतात.

 वरील क्रिकेटचे वगैरे दाखले घेऊनच कांहीं लोक केळकरांवर असा आरोप करतील कीं, राजकीय, सामाजिक वगैरे रणांगणांस केळकर हे वाङ्मयात्मक क्रीडांगण समजून वागतात व त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा गंभीर भावना व कर्मप्रवृत्ति त्यांमध्ये हीनबल आहेत. पण असे म्हणणें म्हणजे माझ्या म्हणण्याचा