पान:विचार सौंदर्य.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४

विचार सौंदर्य


आहे, आणि सौंदर्यविषयक औचित्यांवरचीहि उडालेली आहे. पूर्वीच्या श्रद्धा,निष्ठा, भावना, कल्पना पार गेल्या असे म्हणण्यांत अतिशयोक्ति असेल; पण त्या जाते चालल्या आहेत यांत काडीमात्र कांही खोटें नाहीं. ज्या भाव-भावनांच्या व विचार-विकारांच्या प्रेरणांनीं रामायणांतील व महाभारतांतील व्यक्तींना त्या त्या प्रसंगी तें तें मानण्यास, बोलण्यास आणि करण्यास लावलें, त्या भाव-भावना व ते विचार-विकार आतां जीर्ण होत चालले आहेत. राम-रावणांच्यासारखें युद्ध यापुढे शक्य दिसत नाही. कारण 'देव' नष्ट होत चालले आहेत व राक्षसांची जातहि नाश पावते आहे. आतां आपणांला सर्वत्र 'मानव' दिसत आहेत. गेल्या महायुद्धांत जर्मन लोकांना इंग्लिश लोक ‘ हूण' वगैरे शिव्या व्याख्यानांत व वर्तमानपत्रांत देत असत, पण हें सर्व ओंठावरचें होतें; पोटांत इंग्लिश लोक ओळखून होते कीं जर्मन लोक आपल्यासारखेच आहेत ! तसेंच गेल्या सत्याग्रहयुद्धांत देव-दानवांच्या युद्धाविषयीं भारत-रामायणादिकांत वर्णन केलेला प्रकार दृष्टीस पडत नाहीं, व पडणार नाहीं. कारण गांधी हे इंग्रजांचा द्वेष करूं नका असे स्पष्ट सांगत आहेत व इंग्रजहि गांधीला शिव्या देतांना आढळत नाहींत. हिंदुमुसलमानांचे दंगे अजून होतात, पण रामदासांना किंवा शिवाजीला जें वाटत होतें तें आपणांला वाटत आहे काय ? नीतीच्या बाबतींत हेंच आणि रसिकत्वाच्या बाबतींतहि हेंच. ' नागडा पंथ' जर्मनीमध्ये निघालेला वर्तमानपत्रांत आपण वाचतों, पण त्याबद्दल विशेष राग येत नाहीं. याचप्रमाणें प्रो. र. धों. कर्वे यांनीं समाज-स्वास्थ्य या मासिकावर नग्मप्राय स्त्रीचें चित्र छापलें, किंवा 'रत्नाकरां'नें “ओलेती" हें चित्र छापलें, तर त्याबद्दल आपण विशेष त्वेषानें बोलत नाहीं. मतभेदाचा हा प्रश्न आहे असें आपण समजतों व प्रश्न तेथेंच सोडून देतों, झालें ! सध्यांच्या काळी आपली अशी मनःस्थिति झाली आहे कीं, आपली कशावर विशेष उत्कट श्रद्धा नाहीं; निष्ठा नाहीं; नित्यत्वानें किंवा निश्चयानें आदरणीय किंवा पूज्य असें विशेष कांहीं राहिले नाहीं; भूतकाळावर श्रद्धा नाहीं भविष्य- काळावर विश्वास नाहीं; वर्तमानकाळांत समाधान नाहीं; निश्चित सिद्धान्त नाहींत, निश्चित आकांक्षा व ध्येयें नाहींत; निश्चित स्नेह किंवा द्वेष नाहीं; निश्चयानें मन आनंदविणारी किंवा दुखविणारीं स्थळे किंवा कारणे नाहींत; निश्चयानें विशिष्ट लोकांना बळकट जोडणारी किंवा कायमचीं तोडणारी