पान:विचार सौंदर्य.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनिरुद्ध प्रवाह

१३३

आनंदात्मकच कां व्हावा याला कारण नाहीं आणि 'कळ्यांचे निःश्वास ' वाचून इतका परिणाम श्रीनिवासच्या मनावर जो झालेला दाखविला आहे तोहि कलादृष्ट्या विश्वासार्ह वाटत नाहीं.

 'पुण्यात्मे ' या गोष्टींत, समाजांतील वाईट चालीरीतींबद्दल शाब्दिक निषेध करणारे लोक पुष्कळ असतात, पण बहुतेक लोक स्वतःवर पाळी आली म्हणजे जुन्या समजुतींनाच चिकटून राहातात हें अनुभवाला आल्यामुळे एका बाईला सभांमध्ये वगैरे निषेध करणाऱ्यांची अखेरची कशी चीड येऊं लागते हैं दाखविले आहे. पण दोष दाखवायचाच म्हणजे मात्र असे म्हणतां येईल, कीं विशिष्ट स्त्रीशीं विवाह करण्यास प्रेम, अनुरूपता इत्यादि इतर सर्व गोष्टी अनुकूल असून केवळ समाजाच्या भीतीमुळे किंवा रूढिप्रियतेमुळे एखादा मनुष्य विशिष्ट विवाह करण्यास तयार झाला नाहीं तरच ती चीड आणण्यासारखी ठरेल, एरवीं नाहीं. एखाद्याने एखाद्या रूढीचा निषेध केला म्हणजे त्यानें प्रेमादिकाभावीं देखील विशिष्ट स्त्रीशी लग्न केले पाहिजे आणि आपला निषेध कोठल्याहि परिस्थितींत कृतींत आणलाच पाहिजे असे शास्त्र नाहीं. या दृष्टीने पाहातां एका परित्यक्ता स्त्रीशीं विवाह करण्यास तयार न होणाऱ्या लोकांची परिस्थिति त्या विवाहास योग्य अशीच होती हैं अधिक परिणामकारक रीतीनें दाखविणें जरूर होतें.

 'शास्त्रज्ञाचा शोध' या गोष्टींत 'प्रेमा' चें लक्षण व त्याचा अर्थ यांबद्दल अनेक विद्वानांचीं मतें देऊन प्रेम हें कोठल्याहि कोशांत दिलेल्या विवरणावरून किंवा कोठल्याहि शास्त्रीय उपपत्तीवरून किंवा कोणाशींहि वादविवाद करून कळत नाहीं, तर अनुभवानेंच तें कळतें हें चांगलें दाखविलें आहे. प्रेम काय आहे, ते केव्हां व कसें उत्पन्न होते, हे सांगून कसें कळणार ? याचें विवरण करतांना कृष्णाबाई म्हणतात " क्षितिजावर सूर्य केव्हां येतो तें नक्की कळते पण पहाटेच्या अंधुक अंधाराचें बाराच्या तेजाळ प्रकाशांत कसकसें रूपांतर होतें तें कळत नाहीं. पहाटे आपण चाचपडतों, थोड्या वेळानें म्हणतों, ‘ किती लख्ख प्रकाश पडला आहे ! ' पण तो कुठून येतो, कसा येतो, अणूरेणूंना कसा व्यापतो तें कळते का ?"