पान:विचार सौंदर्य.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३२ 

विचार सौंदर्य

डोळ्यांतून अश्रू आले. पण आईची आठवण होऊन नव्हे, तर 'आई' होऊन चिमण्या मुलांमुलींचें वात्सल्यपूर्वक कौतुक करण्याचे भाग्य आपणांस नाहीं म्हणून ! कल्पना साधीच आहे; पण तिची मांडणी 'तंत्र' दृष्ट्या अत्यंत हृदयस्पर्शी आहे. स्त्रीहृदयामध्यें विशिष्ट वयांत वात्सल्याची भावना तीव्र असते आणि या भावनेचें समाधान या नाहीं तर त्या रीतीने करून घेण्याचा प्रयत्न स्त्रिया करीत असतात. या कल्पनेवर प्रस्तुत संग्रहांत 'लढाईचा शेवट' नांवाची एक गोष्ट आहे; पण ती इतकी परिणामकारक होत नाहीं. याचें कारण असें, कीं नायिकेच्या कृति, तिचें वागणेंसवरणें, तिचे बोलणें-चालणे यांवरून वरील मुद्दा प्रत्ययाला विशेष न येतां दुसऱ्या एका बाईनें तिच्या स्वभावाचें पृथक्करण केलेले त्यांत आपणांस वाचावयास मिळतें.

 'कळ्यांचे निश्वास की सुवास' या गोष्टींत सुप्रसिद्ध विभावरी शिरूरकर यांच्या 'कळ्यांचे निश्वास' या पुस्तकासंबंधी निरनिराळ्या लोकांचें मत दिग्दर्शित करून त्या पुस्तकाच्या वाचनानें एका तरुणाच्या आयुष्यांत एक सुंदर घटना कशी घडून आली हैं दाखविलें आहे. या गोष्टींचें निमित्त करून 'कळ्यांचे निश्वास' यावर लेखिकेनें टीका केली आहे असें कांहीं लोकांचें मत आहे तें मला पसंत नाहीं. विभावरी शिरूरकरांचें हें पुस्तक वाचून कथानायक जो श्रीनिवास त्याला कळून आले की आधुनिक स्त्रियांना शिक्षण मिळाल्यामुळे त्यांच्यांत बंडखोर प्रवृत्ति निर्माण झाल्या असल्या तरी त्यांच्या मूलभूत स्त्रीसुलभ भावना त्याच आहेत. फक्त त्यांच्या प्रकटीकरणाचे मार्ग बदललेले आहेत. हे कळून आल्यामुळे त्याचें ज्या एका मुलीवर प्रेम बसलेलें असतें आणि जी आपणांस स्वीकारील किंवा नाहीं अशी त्याला भीति वाटत असते-किंबहुना जिच्याजवळ जाण्यास तो भीत असतो- तिच्याकडे जाण्याचा धीर वरील पुस्तकामुळे त्याच्यामध्यें उत्पन्न होतो. गोष्ट चांगली आहे; पण नायक-नायिकांचा परिचय होतो, उभयतां- मध्यें प्रेमाचा उदय होण्याची चिन्हें होतीं, पण नायकाला भीति वाटत असल्यामुळे तो उगीच दूरदूर राहतो आणि 'कळ्यांचे निःश्वास' वाचल्यामुळे तो धीर करून विवाहयाचना करतो असे दाखविलें असतें तर तें अधिक प्रत्ययकारक झालें असतें. आहे त्या स्थितींत गोष्टीचा शेवट