पान:विचार सौंदर्य.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनिरुद्ध प्रवाह

'कृष्णाबाई' हें टोपणनांव धारण करणाऱ्या बडोद्याच्या एका लेखिकेच्या मोत्यांप्रमाणें चमकणाऱ्या 'मानसलहरी' पाहून आणि तिच्या मार्मिकतेच्या सात्त्विक तेजाचा आजतागायत चाललेला ' अनिरुद्ध प्रवाह' पाहून आधुनिक कथालेखकांमध्ये तिला 'साहित्य-मुक्ता ' म्हणून दुसरें टोपणनांव देण्यांत येईल असे वाटतें-इतके हे दोन लघुकथासंग्रह मनोहर आहेत. प्रस्तुत 'अनिरुद्ध प्रवाह' वाचून झाल्यावर मला पुष्कळ काळ झालेला नव्हता इतका आनंद झाला आणि इंग्रजीतील उत्तम लघुकथा- लेखकांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसूं शकणारे मराठीतले हातांच्या बोटावर मोजण्याइतके जे लेखक आहेत त्यांमध्यें कालदृष्ट्याच नव्हे तर गुणदृष्ट्याहि ही लेखिका कदाचित् 'कनिष्ठिकाधिष्ठित ' होईल असे वाटू लागलें.

 कृष्णाबाईनीं संसाराकडे डोळे उघडे ठेवून मार्मिकपणे निरीक्षण केलें आहे. त्यांनीं उपदेशकाची भूमिका घेतलेली नसली तरी त्यांना आपले अनुभव आणि विचार कलात्मक स्वरूपांत सांगावेसे वाटतात आणि त्यांची कलेसंबंधीं कल्पनाहि यथार्थ दिसते. 'वैयक्तिक सुखदुःखांवरून निघणारे सामान्य सिद्धान्त अगर व्यापक स्वरूपाचे सामाजिक प्रश्न कलात्मक स्वरूपांत मांडणें म्हणजे वाङ्मय, आपल्या सुखदुःखांच्या कथा म्हणजे वाङ्मय नव्हे ' असे त्यांच्या एका कथेंतील एक पात्र म्हणतें तें त्यांच्या मताचेंच दिग्दर्शक असावें असें प्रस्तुत लघुकथांच्या संग्रहावरून म्हणण्यास हरकत नाहीं.

 या संग्रहांत एकंदर दहा लघुकथा आहेत. त्यांतील 'आई' ही मला तंत्राच्या व इतर दृष्टीनें फारच आवडली. त्यांतील 'मुद्दा' विशेष कांहीं गहन नाहीं. कवि यशवंत यांची 'आई' ही सुप्रसिद्ध कविता पूर्ववयांत ऐकल्यावर एका युवतीला आपल्या दिवंगत आईची आठवण झाली आणि तिनेंच बारातेरा वर्षांनंतर यशवंतरावांची तीच कविता ऐकल्यावर तिच्या