पान:विचार सौंदर्य.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गतगोष्टी अर्थात् माझी जीवनयात्रा

१२९

 त्यांच्या अंगीं त्रिगुणातीत स्थितप्रज्ञता बाणली आहे असें मात्र नव्हे आणि ते तसें भासवीतहि नाहींत. आत्मचरित्रांतील कांहीं ठिकाणच्या भाषेवरून त्यांना अद्यापि चीड येते; उपरोधिक आणि खोंचदार टीका करण्याचा मोह त्यांना अद्यापि आवरत नाहीं; वादविवादांत चार टोले देण्याची व घेण्याची खुमखुमी त्यांच्यामध्यें अजूनहि आहे; आपला गौरव झालेला पाहून त्यांचें मन आनंदित होतें; आर्थिक दृष्ट्या आपण स्वतंत्र आहोत आणि कोक्णांत जाण्यायेण्याच्या आपल्या हौशी आपण पुरवूं शकतो याबद्दल त्यांना धन्यता वाटते असें दिसून येतें आणि मनुष्यसुलभ हर्षशोकांपासून ते अगदी मुक्त आहेत असे दिसत नाहीं. पण एवढें स्पष्ट दिसते, कीं क्षुद्र कामक्रोधादिकांच्या कचाटींतून ते सुटले आहेत आणि मनुष्यसुलभ जे मनोविकार, त्यांना त्यांनीं पुष्कळच आटोक्यांत आणले आहे आणि सर्वांत मला आनंदाची गोष्ट वाटते ती ही कीं या संसारांतील हेवेदावे, रुसवेफुगवे, रागलोभ वगैरेंपासून ते जरी पूर्णपणे अलिप्त झालेले नसले, तरी त्यांच्या सांसारिक मनाची बैठक आतां उच्च भूमिकेवर गेलेली असून मधूनमधून ते तेथील निर्मळ वातावरणांत हिंडतफिरत निरीक्षण-मननादि व्यापार प्रसन्नतेनें करूं शकत आहेत आणि खालच्या चढउतारांकडे, खांचखळग्यांकडे, त्याच्या आसपास बागडणाऱ्या पशुपक्ष्यांकडे, शेतांत खपणाऱ्या शेतकऱ्यांकडे, बागेंत रोपांची वगैरे जोपासना करणाऱ्या माळ्यां- कडे, किंबहुना टक्कर देणाऱ्या व शिंगाशिंगी करणाऱ्या बैलटोणग्यांकडेहि किंचित् ताटस्थ्यानें, बऱ्याच कुतूहलानें, कित्येक वेळां कौतुकानें आणि सामान्यतः निर्विकारतेनें व नि:स्वार्थतेने पाहूं शकत आहेत.

 " केळकरांना स्वपक्षांत मित्र नाहीं, प्रतिपक्षांत शत्रु नाहीं " अशी एक चाटूक्ति (Epigram) केळकरांनींच दिलेली आहे. “केळकरांना महाराष्ट्राच्या राजकारणांत पहिल्या पंक्तीत जो बसवील तो मूर्ख आणि त्यांना साहित्य- कारणांत दुसरा नंबर देईल तो मूर्ख " अशी दुसरी चाटूक्ति त्यांनीं दिली आहे. “केळकर चांगले आहेत म्हणून त्यांना वाईटपणा आलेला आहे अशी तिसरी एक चाटूक्ति मी सुचवितों ! “केळकर हे समतोलपणें विचार करतात हाच त्यांचा गुण आणि हाच त्यांचा दोष " अशी आणखी एक भर घालतां येईल. या सर्वोवरून एवढें दिसून येतें, कीं केळकरांच्या गुणांनीं

 वि. सौं... ९