पान:विचार सौंदर्य.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८ 

विचार सौंदर्य

दृष्टीनें तरी ) रुळावर आणण्याचें श्रेय तर त्यांना कोणी देत नाहींच; उलट त्यांनीं पुरस्कारलेलें धोरण स्वीकारून त्यांनाच उलट नाहीं नाहीं त्या प्रकारें दूषण देणाऱ्यांकडे पाहूनहि त्यांना खेद होतो. लो. टिळकांची धडाडी, त्यांचें धाडस, त्यांची अलौकिक आणि सर्वगामी बुद्धिमत्ता इत्यादि गुण आपल्यामध्यें नाहींत हैं केळकरच प्रांजलपणें कबूल कारतात; पण लो. टिळकांचें धोरण बिकट परिस्थितीतहि स्वशक्त्यनुसार आपण चालू ठेवलें याची जाणीव मनांत न बाळगतां टिळकांच्या अपेक्षेने आणि त्यांच्याशींच तुलना केली असतां आपणांमध्ये दिसून येणाऱ्या उणीवांवर भर देणाऱ्या निंदकांबद्दल त्यांच्या मनांत अनादर आहे. 'लोकशिक्षण' मधील टिळकभक्तानें त्यांची जी सुसंस्कृत निंदा केली आहे तिला उत्तर देण्याकरितां त्यांनीं बरींच पानें खर्चिलीं आहेत, यावरून ही निंदा त्यांच्या मनाला लागलेली दिसते.

 त्यांच्या मनाला समाधानहि पुष्कळ गोष्टींनीं झालेले दिसतें. कोकणांत जाऊन राहण्याची इच्छा त्यांना मधूनमधून तरी पुरवून घेतां येते, प्रकृति सामान्यतः बरी असते; आर्थिक श्रीमंती जरी नसली, तरी दैन्याचे प्रसंग आलेले नाहींत व येत नाहींत. पत्नी शालाशिक्षित नसली तरी समंजस, तारतम्यज्ञ, सत्प्रवृत्त आणि मनानें सुसंस्कृत — इतकी की त्यांच्या यशाचें श्रेय तिच्याकडे थोडेंसें जाते हैं प्रांजलपणें त्यांना कबूल करावेंसें वाटतें; आपल्याकरितां जीव देणारे मित्र नसले, तरी आपला जीव घेऊं पाहणारे शत्रु नाहीत; आपण जाणून बुजून व्यर्थ परसंताप केलेला नाहीं आणि आपणाला खल-नम्रताहि स्वीकारावी लागली नाहीं; आपल्या हातून आपल्या शक्तीप्रमाणें उच्चतम दर्जाचें नसले, तरी विविध क्षेत्रांत समाधान मानण्याइतकें वरच्या दर्जाचें यश प्राप्त झालेले आहे; लोकप्रियतेचे हारतुरे, मानमान्यतेच्या खुर्च्या, आदरातिथ्याच्या मेजवान्या, गौरवांचीं स्तुतिसुमनें, वगैरे ज्या गोष्टी एखाद्यानें नाहीं म्हटल्या तरी त्याला प्रिय असतातच, त्या सर्व आपणांस उपलब्ध झाल्या आहेत; या सर्वोची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांना उचित असा अभिमान वाटतो; आणि कांहीं क्षण समाधान तर इतकें वाटतें कीं, मरणाची हाक ऐकूं आली तर 'ओ' म्हणण्यास आपण राजी आहोत असें ते ग्रंथाच्या शेवटीं म्हणतात- किंबहुना त्या ' हाकेची आपण वाट पहात आहोत' असे त्यांचे शब्द आहेत !