पान:विचार सौंदर्य.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गतगोष्टी अर्थात् माझी जीवनयात्रा

१२७

छापून वरील स्वभावचित्रें वगैरे मजकूर जर या आत्मचरित्रात समाविष्ट केला असता, तर तें अधिक समुचित झालें असतें त्यांनी लिहून ठेवलेला पण सध्यां बाजूस सारलेला, हा मजकूर वाचनीय आणि मननीयहि असणार याबद्दल मला तरी शंका नाहीं. त्यांनीं तो बाजूला ठेवला यांत स्थलाभावाप्रमाणे दुसरेहि कांहीं हेतु असतील हें मी कल्पनेनें जाणूं शकता. तेव्हां त्यांना त्याबद्दल दोष देण्याचें अनौचित्य करण्याचें टाळून आणि माझी व वाचकांची अपेक्षा काय होती एवढेच सांगण्याचा येथें हेतु आहे, एवढे सांगून हा मुद्दा येथेंच सोडतों.

 चरित्रकार बहिर्मुख दृष्टीने पाहत असतो आणि लिहीत असतो. तो चरित्रनायकाच्या अंतःकरणांत शिरण्याचा प्रयत्न करतो, पण हा परचित्तप्रवेश पूर्णपणें यशस्वी होणें अशक्यप्राय आहे. आत्मचरित्रकाराला देखील आपल्या अंतःकोशांतील जाणिवेच्या कोपऱ्यांत आणि नेणिवेच्या बळदांत सुप्त असलेले किंवा दडले- दडपलेले विचार व विकार कळणें दुरापास्त असतें असें अलीकडील मानसशास्त्रज्ञ सांगतात तें अगर्दी खरें आहे. पण बहिर्मुख चरित्रकारापेक्षां कांहींतरी अधिक गोष्टी अंतर्मुख आत्मचरित्रकाराला कळणे शक्य आहे. विशेषेकरून आत्मवंचना न करून घेण्याबद्दल दक्ष असलेल्या आणि बव्हंशीं निरपेक्ष आणि संन्यस्त होऊन ताटस्थ्यानें सिंहावलोकन करूं पाहणाऱ्या केळकरांसारख्या समतोल बुद्धीच्या माणसाला थोडेंबहुत तरी तें शक्य आहे आणि तें या पुस्तकांत थोडेसें साधलेलें दिसतें. निदान त्यांचा हा प्रयत्न प्रामाणिक आहे आणि मानसपृथक्करण व मनोगाहन करूं पाहणाऱ्या चिकित्सकास फार युक्त आहे.

 या आत्मचरित्राच्या आधारें केळकरांच्या मनांत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चीड कशाची येते, मनाला कोणत्या गोष्टी शल्याप्रमाणें बोंचतात, त्यांच्या मनाची सध्यां घडण कोणत्या प्रकारची झाली आहे, वगैरे, गोष्टींचा थोडासा थांगपत्ता लागूं शकतो. खाडिलकरांना केसरींतून जावें लागलें याबद्दलचें खापर त्यांच्यावर उगीचच्या उगीच फोडण्यांत येतें ही गोष्ट त्यांच्या मनाला लागलेली दिसते. शिवरामपंत परांजप्यांच्यामध्यें आदराई विशेष गुण असले तरी त्यांच्या पद्धतीनें त्यांनी केलेली कुत्सित टीका ही देखील त्यांना बोचत असावी. हिंदी राजकारणाला ( त्यांच्या