पान:विचार सौंदर्य.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२६

विचार सौंदर्य


 आणि खरें बोलायचें म्हणजे आत्मचरित्रामध्यें तात्त्विक भूमिकेबद्दलचीहि मी फारशी अपेक्षा करीत नाहीं. आत्मचरित्रामध्यें बारीक सारीक गोष्टींनाच विशेष महत्त्व आहे. या बारीकसारीक गोष्टी इतरांना माहीत नसतात म्हणून त्या आत्मचरित्रकारांनीं द्याव्यात हें एक; आणि दुसरें अधिक समर्पक कारण असें, कीं लोकांच्या डोळ्यांसमोर चमकणाऱ्या ( लोकांच्या डोळ्यांत भरणाऱ्या किंवा खुपणाऱ्या ) मोठ्या गोष्टींपेक्षां क्षुल्लक भासणाऱ्या अप्रसिद्ध गोष्टींवरून मनुष्याचें व्यक्तिमत्त्व अधिक स्पष्टत्वानें दिसून येतें, -निदान या गोष्टींवरून त्या मनुष्याचें स्वभावचित्र केवळ बौद्धिक, भावात्मक, निराकार न राहतां त्या चित्राला मूर्त, सजीव, रूप-रस-गंधयुक्त विशिष्ट स्वरूप येतें; आणि शिवाय ही गोष्ट निश्चित की लोकांना थोरामोठ्यांच्या लहानसहान गोष्टी ऐकण्याची ( बऱ्याच वेळीं मनोविकृतिजन्य ) जिज्ञासा असते. विकृत जिज्ञासेची तृप्ति करण्याची जबाबदारी आत्मचरित्र-लेखकावर नाहीं हें खरें; पण स्वाभाविक व निर्दोष जिज्ञासेची तृप्ति करण्यांत कांहींएक गैर नाहीं. इतकेंच नव्हे तर आत्मचरित्र-लेखकाच्या व त्याच्याशी संबंध असलेल्या लोकांचें स्वभाववैशिष्ट्य, त्यांतील सूक्ष्म, गुंतागुंतीच्या विरोधाभासात्मक छटा, इतरांना न दिसणारे पैलू, इत्यादिकांचें दिग्दर्शन केल्याने आत्मचरित्र- पर लिखित चरित्रापेक्षां मनोरंजक व उद्बोधक होऊन त्यांतील उणीव भरून काढते आणि अशा रीतीनें पूरक आणि पोषक ठरतें.

 केळकरांचा संबंध राजकीय पुढारी, समाजसेवक, शिक्षणशास्त्रज्ञ, कायदेपंडित, शेठसावकार, साहित्यिक, नट वगैरे अनेक प्रकारच्या व थरांतल्या लोकांशीं आलेला होता. तत्संबंधीं या आत्मचरित्रांत कांहीं गोष्टी वाचण्यास मिळतील अशी वाचकांची अपेक्षा असते. परंतु तिचा भंग झाल्यामुळे हें आत्मचरित्र वाचून थोडेंसें असमाधान उत्पन्न होतें. केळकरांनी आपल्याशी संबंध आलेल्या कांहीं व्यक्तींच्या गोष्टी व कांही स्वभावचित्रे लिहून ठेवलीं आहेत ( सुमारें चारशें पानांपर्यंत असा मजकूर आहे ); पण पुस्तकाची हजारएक पानें भरून गेल्यामुळे तो मजकूर त्यांत समाविष्ट करतां आला नाहीं हें त्यांनींच एके ठिकाणीं सांगितल्यावरून मला ठाऊक आहे. पण व्यक्तिशः माझें तरी ( आणि बहुतकरून बहुतेक सर्व वाचकांचें ) मत असें आहे कीं, त्यांनी आपली राजकीय कैफियत स्वतंत्र पुस्तकांत