पान:विचार सौंदर्य.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गतगोष्टी अर्थात् माझी जीवनयात्रा

१२५

 केळकरांच्या सार्वजनिक आयुष्यक्रमाबद्दलचीं जीं प्रकरणें आहेत त्यांची वाङ्मयकला या दृष्टीनें विशेष स्तुति करतां येईल असें मात्र म्हणवत नाहीं. केळकरांचें कोणतेंहि लिखाण घेतलें तरी वाङ्मयदृष्ट्या त्यांत सामान्य लेखकाहून अधिक गुण असावयाचेच, त्याचप्रमाणे या प्रकरणांतहि आहेतच; पण ते उत्कटत्वानें नजरेंत भरत नाहींत असें मला म्हणावयाचें आहे. हीं प्रकरणें आत्मसमर्थन या नात्यानें लिहिलेली दिसतात. ( न्यूमन या लेखकाच्या एका ग्रंथाचें नांव ' Apologia Pro Vita Swa ' म्हणजे 'आत्मजीवनसमर्थन' असें आहे; तें नांव या विभागाला द्यावेंसें वाटतें.) आत्मसमर्थन करण्यांत कांहीं गैर आहे असें नाहीं, किंबहुना दुसऱ्यानें आपली बाजू उचलून धरण्यापेक्षां आपण आपली बाजू आपल्या दृष्टीनें मांडणें हें उचितच नव्हे, तर आवश्यक आहे. एक कारण असें, कीं एखाद्याच्या मनांतले सर्व हेतु, त्याची मनःस्थिति आणि त्याच्यापुढे असलेली सर्व परिस्थिति यांची माहिती त्याच्याप्रमाणे इतरांना असणे शक्य नाहीं आणि अपूर्ण माहिती असलेल्या स्नेह्यानें आपले समर्थन केले तर एखादे वेळेस 'मित्रांपासून माझा बचाव करा (Save me from my friends) असे म्हणण्याची पाळी येते ! आणि अशी जरी पाळी आली नाहीं, तरी त्या समर्थनांत पूर्ण ज्ञानाच्या अभावामुळे कांहीं- तरी उणीवा राहणारच. तेव्हां केळकरांनी आत्मसमर्थन लिहिलें हें उचितच केलें. पण या आत्मसमर्थनांत वाङ्मयकलेचा उत्कर्ष दिसत नाहीं. त्याच- प्रमाणें तात्त्विक व व्यापक दृष्टीचाहि उत्कर्ष जेवढा दिसावा तेवढा दिसत नाहीं असेंच म्हटले पाहिजे. केळकरांचें त्या त्या काळचें राजकीय धोरण बव्हंशीं मान्य असणाऱ्यांपैकी मी आहे. पण या धोरणाकडे इतक्या वर्षीनंतर मागे वळून पाहतांना त्या त्या काळच्या स्वपक्षीय व परपक्षीय धोरणापाठीमागील व्यापक तात्त्विक भूमिकांची (Ideologies) मीमांसा करणें जरूर होतें; पण तें या ग्रंथांत विशेष दिसत नाहीं. केसरीमध्ये आणि इतर ठिकाणी त्यांनी आपल्या धोरणाविषयीं पुष्कळच लिहिलेले आहे, म्हणून पुनरुक्तिभयास्तव त्यांनी या गोष्टी टाळल्या आहेत हे त्यांनी या पुस्तकांतच म्हटले आहे. पण तपशिलापेक्षां तात्त्विक भूमिकेविषयींची उणीव मला भासत आहे, त्याविषयींची माझी तक्रार आहे.