पान:विचार सौंदर्य.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गतगोष्टी अर्थात् माझी जीवनयात्रा

 रा. न. चिं. केळकर यांच्या तोंडावरहि त्यांची निंदा करणारे जसे आहेत तसेच त्यांच्या पाठीमागेंहि त्यांची स्तुति करणारे आहेत. त्यांच्या गुणावगुणांची छाननी जो तो आपापल्यापरीनें करीतच असतो. पण श्री. केळकर स्वतः आपल्यासंबंधी काय म्हणतात हे जाणण्याचें साधन त्यांचें आत्मचरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वी कांहीं नव्हतें. हें साधन आतां उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या जीवनकार्याची मूल्यमीमांसा करण्याच्या कामी एक मोठा आधारग्रंथ चिकित्सक मीमांसकांना लाभला आहे. त्यांच्या जीवनकार्याकडे ज्यांनीं विकृत दृष्टीने पाहिलें ते त्यांच्या या ग्रंथाकडेहि विकृत दृष्टीने पाहतील यांत नवल नाहीं; पण कांहीं बाबतींत तरी त्यांना आतां भलती निंदा करणे कठीण पडेल. एकच लहानसें उदाहरण द्यावयाचें म्हणजे केसरी कचेरीमधून श्री. खाडिलकर जे निघाले ते केळकरांच्या कारवाईमुळे निघाले हैं यापुढे म्हणणें जरा धाष्टर्याचेंच होईल. श्री. केळकरांची भलतीच स्तुति करणारे स्तुतिपाठक फारसे नव्हतेच व नाहींतहि. तेव्हां या ग्रंथामुळे त्याच्या चहात्यांच्या मनांत फारसा फरक व्हावयाचा नाहीं. झालाच तर केळकराबद्दलचा आदर वाढविणाराच होईल.

 मी या दुसऱ्या वर्गात मोडणारा आहे. अर्थात् हें पुस्तक वाचून त्यांच्याबद्दलचा माझा आदर वृद्धिंगत झाला है उघड आहे. या पुस्तकांतील पहिलें प्रकरण ' हृदत' नांवाचें आहे तें, आणि शेवटलें प्रकरण आत्म- निरीक्षण ' नांवाचें आहे तें, ह्रीं दोन्हीं वाङ्मयकलेच्या दृष्टीने अत्यंत रमणीय झालेली आहेत. त्याचप्रमाणे ' कोकण्याची विलायत ', ' कांहीं कौटुंबिक माहिती ', 'लहानपणच्या आठवणी ', ' कॉलेज व विद्यापीठ या प्रकरणांत त्या त्या विषयाची माहिती तर आहेच, पण असली माहिती केळकरांसारख्या रसिक आणि कसलेल्या लेखकानें दिली म्हणजे ती किती मनोरंजक व उद्बोधक होऊं शकते हे त्यांवरून दिसून येतें.