पान:विचार सौंदर्य.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी व माझे टीकाकार

१२३

' वामनराव व गाढव '
'वामनराव व अच्युतराव यांचा वाद'

असे मथळे द्यावेत असें प्रथम वाटलें, पण अच्युतरावांनी पुनः माझ्या वरतीच डाव उलटवला असता या भीतीनें ( व इतर कारणांस्तव ) मीं पत्र लिहिलें नाहीं !

 माझ्यावरच्या टीकेंतील एक मौजेची गोष्ट सांगून हा लेख संपवितों. मडगांव [ गोवें ] येथें साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून जें भाषण केलें त्यांत मुंबईतील एका साप्ताहिकासंबंधानें मीं जें थोडेसें प्रतिकूल लिहिलें होतें तें वाचल्याबरोबर त्या साप्ताहिकाचा संपादक भडकला आणि त्यानें मला एक भरले मोठें लांबलचक पत्र लिहून माझ्या विधानाची सत्यता पटवून देण्याबद्दल आव्हान केलें. मौज अशी कीं, माझीं ह्रींच विधानें (बहुधा न वाचतांच ) त्या साप्ताहिकास अत्यन्त अनुकूल व स्तुतिपर आहेत असें पुण्यांतील एका सुप्रसिद्ध साप्ताहिकाच्या सुप्रसिद्ध संपादकास वाटून, माझ्या विधानांतील स्तुतीबद्दल तोहि भडकला आणि त्यानेंहि मला भलती स्तुति केल्याबद्दल दोष दिला ! माझ्या विधानांतील भाषा संदिग्ध होती असें वाटत नाहीं; मग असें कां झालें ? कारण कांहीं का असेना, विशेष खोलांत जाऊन तें हुडकून काढण्यांत अर्थ नाहीं. हा अनुभव मात्र मला मौजेचा बाटला आणि म्हणून येथें सांगितला.

                                                     * * *