पान:विचार सौंदर्य.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी व माझे टीकाकार

१२१

लक्ष नाहीं. 'सुशीलेच्या देवा'-मध्यें मोटारी ज्या काळीं हिन्दुस्थानांत आलेल्या नव्हत्या त्या काळी त्या आलेल्या होत्या असें वर्णन आहे तें चूक आहे. 'इन्दु काळे व सरला भोळे' या कादंबरींतहि पत्रांच्या तारखांचे बाबतींत कांहीं चुका झाल्या आहेत, त्या एका टीकाकारानें दाखविल्या तें योग्यच झाले. आनंदाची गोष्ट ही कीं, हे दोष दाखवितांना कठोरता कोणी स्वीकारलेली नाहीं. 'आश्रमहरिणीं 'त असेच कांही दोष आहेत ते केरळकोकिळकार व महाराष्ट्रभाषाचित्रमयूर कै. आठल्ये यांनी दाखविले आहेत. पण त्यांनीं कठोर भाषा वापरली होती असें स्मरतें. याच लेखकानें 'आश्रमहरिणी' वर टीका करतांना मी स्त्री-पुरुषांच्या स्वैरसंभोगाचा पुरस्कार करीत आहें असें सुचविलें आहे ! 'आश्रमहरिणीं 'तील पवित्र वातावरण ज्याला माहीत आहे त्याला ही टीका किती अन्यायाची आहे हें सांगावयास नको. परंतु भाषाचित्रमयूराच्या पिसाऱ्याकडेच पहावयाचे असते व या पिसाऱ्यांतील डोळ्यांना दिसत नसतें हें ध्यानांत ठेवावयाचें असतें !

 'आश्रमहरिणी' ही टेनिसनच्या 'इनॉक आर्डेन ' या काव्यावरून चोरून घेतलेली आहे असें कांहीं टीकाकार म्हणतात, हें ऐकून मला प्रथम वाईट वाटत असे; पण आतां वाटत नाहीं. एक तर ही गोष्ट थोडीशी खरी आहे; थोडीशी म्हणजे फारच थोडीशी, पण टेनिसनच्या उपरिनिर्दिष्ट काव्याचा माझ्या मनांत, वरील कादंबरी लिहितांना, विचार आला होता यांत शंका नाहीं; दुसरें असें कीं, उसनवारीचा किंवा चोरीचा आरोप करणारे लोक सामान्य दर्जाचे आहेत असे मला ठाऊक आहे; अनेक रसिकांनीं आश्रमहरिणीची स्तुति केलेली आहे; इतकी कीं ती 'रागिणी - पेक्षांहि चांगली आहे, असें पुष्कळ मार्मिकांचे म्हणणे आहे. तिसरी गोष्ट. अशी कीं, जगानें—म्हणजे सामान्य जगानें-उसनवारीचा आरोप करणें हें सामान्य व्यवहाराला धरूनच आहे; चोरीचा एक दागिना, एखाद्याजवळ सांपडला म्हणजे त्याच्याजवळचे इतर दागिनेहि चोरींचे असण्याचा संभव आहे असें मानणें व्यवहाराला धरूनच आहे! विक्रमोर्वशीय या नाटकामध्यें । वेड लागलेल्या पुरूरव्यानें उर्वशीची चालण्याची सुंदर रीत हंसाने उचलली आहे असें पाहून हंसाला म्हटले " हंसा ज्या अर्थी तूं उर्वशीची गति