पान:विचार सौंदर्य.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२० 

विचार सौंदर्य

 आतां माझ्या लेखनावर जी टीका झालेली आहे तिच्याकडे वळतों. प्रथम गंभीर विषयावरच्या गंभीर स्वरूपांच्या पुस्तकांकडे पाहतां 'नीतिशास्त्रप्रवेशा'- वर सर्वांनी अनुकूल टीका केलेली आहे हें ध्यानांत येतें आणि आनंद होतो. या पुस्तकांवर विस्तृत टीका श्री. नानासाहेब चाफेकर यांनीच केली आहे व ती विद्वत्त्वपूर्ण आणि मार्मिक आहे. 'साक्रेटिसाचे संवाद ' या पुस्तकावर कोणीच विस्तृत टीका केली नाहीं, पण तें कांहीं विश्वविद्यालयांत अभ्यसनीय पुस्तकांत नेमलें गेलें यानें माझें समाधान झालें, 'विचार-विलास' या पुस्तकावर विस्तृत टीका झालेली नाहीं. पण तेंहि नागपूरकडे विद्यापीठांत अभ्यासिलें जातें ही कांहीं थोड्या समाधानाची गोष्ट नाहीं.

 कादंबऱ्यांपैकीं 'रागिणी' वर कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची टीका आहे. त्यांच्यासारख्या नामांकित साहित्यमर्मज्ञानें सांगोपांग टीका केल्यामुळे धन्यता वाटली. त्यांच्या टीकेंत पुष्कळच ग्राह्यांश आहे. एका गोष्टीबद्दल मला अद्यापि आश्चर्य वाटतें आणि तें हें कीं 'रागिणीं 'तील भय्यासाहेबांच्या स्वभावाचें मर्म कोल्हटकरांसारख्यांच्या ध्यानांत कसें आलें नाहीं. त्यांनीं भय्यासाहेबाला पत्नीत्यागादि दोषांबद्दल खलनायकाचीच पदवी दिलेली आहे. त्यांची टीका समर्थनीयहि असेल, पण टीका यथार्थ वा अयथार्थ हा सध्यांचा प्रश्न नसून मला त्या टीकेसंबंधानें काय वाटले हा प्रश्न असल्यामुळे हा मुद्दा येथेंच सोडतों.

 रागिणीच्या मनांत पापविचार स्पर्श करून गेला असें दाखविल्याबद्दलहि कांहीं ठिकाणीं टीका झाली. पण आतां तशी टीका ऐकूं येत नाहीं ! पूर्वी समाजांतील अप्रिय सत्याकडे डोळेझांक करण्याची कांहीं लोकांची प्रवृत्ति होती ती आतां दिसत नाहीं. (आतां समाजांतील अप्रिय सत्याकडेच टक लावून पाहण्याची प्रवृत्ति वाढत आहे आणि कावळे जसे व्रणविदारण करण्यांत आनंद मानतात तसे कांहीं साहित्यिक सामाजिक व्रणांचें पृथक्करण करण्यांत आनंद मानीत आहेत !)

 रागिणीच्या शेवटल्या खंडांत कांहीं रात्रींचें वर्णन करतांना त्या त्या वेळीं चंद्र अमक्या ठिकाणीं होता असें वर्णन केलेलें आहे, तें चुकीचें आहे हें टीकाकारांनीं दाखविलें आहे व तें सहानुभूतिपूर्वक भाषा वापरून दाखविलें आहे. खरी गोष्ट अशी आहे कीं, माझें असल्या गोष्टींकडे फारसें