पान:विचार सौंदर्य.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी व माझे टीकाकार

११९

कांहींचें तरी कर्तव्यकर्म पहिल्या प्रकारचें असतें; त्यांनीं निर्णयाबद्दल घाई करण्याचे कारण नसतें; त्यांनी लोकांना खरें-खोटें, चांगले-वाईट, शुद्ध- अशुद्ध, सिद्ध-असिद्ध हें खड्यांप्रमाणें हातावर निवडून ठेवले पाहिजे असें नाहीं, तर खरें- खोटें, चांगले-वाईट, इत्यादि कसें ठरवावयाचें हें त्यांनीं शिकवावयाचें असतें आणि खरें, चांगलें, शुद्ध, सिद्ध इत्यादि इष्ट गोष्टीं- बद्दल आस्था, उत्साह व भक्ति उत्पन्न करावयाची असते. मी विद्यार्थिनीं- मध्ये आणि वाचकांमध्ये यांत्रिक रीतीनें लाखों आयते गोळीबंद सद्विचार आणि सद्भावना उत्पन्न करूं शकलों आणि सद्विचार व सद्भावना कशा ओळखाव्यात हें सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलेले नसेल तर माझें समाधान होणार नाहीं. उलटपक्षी, मी त्यांना एकहि निश्चित स्वरूपाचा विचार दिला नसला आणि अमुकच भावना श्रेष्ठ असा निर्णय त्यांमध्यें उत्पन्न केलेला नसला पण त्यांच्यामध्ये मी जर सद्विचार करण्याची व ओळखण्याची, तसेंच सद्भावनांनीं प्रेरित होण्याची व त्यांची मूल्यमीमांसा करण्याची शक्ति निर्माण केलेली असली, तर मला धन्यता वाटेल !

 तिसरी गोष्ट अशी की, कांहीं कांहीं गोष्टी अद्यापि अनिर्णित अवस्थेत- ' असिद्ध ' स्थितींत आहेत. त्याबद्दल निर्णयात्मक मत देण्याची जरूर नसतां ( किंवा तसा आपला अधिकार नसतां म्हणा पाहिजे तर ) लोक आपणाला संशयात्मा म्हणतील या भीतीनें किंवा आपण मोठे शहाणे आहोत हे दाखविण्याच्या लालसेनें, भरभक्कम पुराव्याच्या अभावीं निर्णयात्मक मत ठोकून देणें हें धाष्टर्याचेच केवळ नव्हे, तर तें अप्रामाणिक व पापस्वरूप आहे.

 या बाबतींत चवथा मुद्दा माझ्यापुरताच सांगण्यासारखा आहे आणि तो असा कीं, मी पुष्कळ वेळां माझें मत निश्चित व निर्णयात्मक स्वरूपांत दिलेलें आहे, पण तें कोणी लक्षांतच घेत नाहीं ! अतिविचार हा गुण (किंवा दोष ) माझ्यामध्यें इतरांपेक्षा अधिक असेल आणि एखादा गुण किंवा दोष जरा कोठें सामान्य प्रमाणाहून अधिक प्रमाणांत दिसला, की त्या व्यक्तींवर त्या गुणाचा किंवा दोषाचा शिक्का कायमचा बसतो. लोकांच्या या प्रवृत्तीमुळे कांहीं दोषांचा शिक्का माझ्यावर जसा कायमचा बसला आहे तसा कांहीं गुणांचाहि शिक्का बसला असल्यामुळे फिटंफिट झाली असें मीं समजतों व मनांत हंसतों !