पान:विचार सौंदर्य.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११८ 

विचार सौंदर्य

माझी जी वृत्ति आहे तिचें महत्त्व अद्यापि पुष्कळ लोकांना कळलेले नाहीं व या वृत्तीचा अर्थहि कित्येकांच्या ध्यानांत येत नाहीं. या कर्मभूमींत ' संशयात्मा विनश्यति ' हे मला माहीत आहे. कार्यकर्त्यांना जन्मभर बुद्धीच्या हिंदोळ्यावर बसून अनुकूल-प्रतिकूल विचारांच्या आंदोलनांत काल घालविणें शक्य नाहीं, त्यांना पुष्कळ वेळां निश्चयात्मक वृत्ति स्वीकारावी लागते व त्याप्रमाणे वागावें लागतें हैं मला समजतें. इतकेंच नव्हे, तर त्याचप्रमाणें मी वागतोंहि व वागण्यास सांगतोंहि. एखाद्या राजाचें किंवा मोठ्या मुत्सद्याचें रक्षण करण्याकरितां नेमलेल्या हेरांना एखादा संशयास्पद मनुष्य दिसला म्हणजे प्रथम त्याला अडवून ठेवावें, असें हेरखात्याचें जें तत्त्व आहे तें मला पूर्णपणे मान्य आहे. हेरांनीं ज्यांच्यापासून धोक्याचा संभव आहे अशा संशयास्पद लोकांना आधी अटकेंत ठेवण्याचें काम करावयाचें आणि मग ते खरोखर संशयास्पद आहेत कीं नाहींत, त्यांपासून खरोखर धोका आहे का नाहीं, याची शहानिशा करावयाची, असे मी त्या खात्याचा मुख्य असल्यास त्यांना सांगेन. कारण खरें- खोटें ठरविण्यास वेळ लागतो आणि तोपर्यंत एखाद्या वहिमी मनुष्यास मोकळे- पणानें वावरूं दिल्यास एखाद वेळेस तो घात करावयाचा आणि मग त्या हेरांचा उपयोग प्रेतयात्रेपुरताच ठरावयाचा ! तेव्हां ज्यावेळीं संपूर्ण, सांगोपांग, सर्व बाजूंनीं व सर्व दृष्टींनीं विचार करणे धोक्याचें असतें त्यावेळेस उपलब्ध पुराव्यावरून त्या त्या कार्ली योग्य वाटणारा निर्णय स्वीकारून कर्तव्यकर्म केलेच पाहिजे असें माझें मत आहे. पण असे कांहीं प्रसंग नसतां अनिर्णित स्थितीच वाईट, सर्वांगीण विचार म्हणजे विकार, अनिश्चय म्हणजे अर्धवटपणा, अशा प्रकारची विचारसरणी स्वीकारून घाईनें निश्चय करणें हें मी वाईट समजतों.

 दुसरी गोष्ट अशी कीं, कांहीं लोकांचें कर्तव्यकर्म 'विचार करण्यास -शिकवावयाचें' हें असतें व कांहीं लोकांचें कर्तव्यकर्म त्यांना संमत अशा ' सन्मार्गाचें अवलंबन करण्यास लोकांना लावावयाचें' असें असतें; युद्धांत गुंतलेले सेनानायक, राजकीय कार्यकर्ते, पुढारी, संस्थेचे चालक व पुरस्कर्ते, चळवळे, खटपटे, अशा लहानमोठ्या लोकांचें कर्तव्यकर्म दुसऱ्या प्रकारचें असतें; कलावंत, तत्त्वजिज्ञासु, शास्त्रसंशोधक, शिक्षक वगैरे लोकांपैकी