पान:विचार सौंदर्य.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी व माझे टीकाकार

 ' मी व माझे टीकाकार ' यासंबंधानें 'ज्योत्स्ने ' च्या संपादकांनी चार शब्द लिहिण्यास सांगितलें, तेव्हां माझ्या लेखनाविषयीं व माझ्याविषयीं मी विचार करूं लागलों आणि पहिल्या प्रथम हा विचार आला कीं, सिंहा- वलोकन करण्याचे आपले दिवस आलेले दिसतात-आतां पुढे जाण्याचे दिवस संपत आले, मागें पाहून गत सुखदुःखांचा आढावा घेऊन तो लोकांना सांगण्याचे दिवस आले ! तथापि आयुःप्रवासाच्या मध्यभागीं देखील क्षणभर सिंहावलोकन करण्याचाहि हा काल असूं शकेल असा आशावाद स्वीकारून माझ्या टीकाकारांची आठवण करूं लागलों, तेव्हां माझ्या टीकाकारांना माझ्यांत जे गुण दिसले ते माझ्यामध्यें नाहींत आणि माझ्यांत जे दोष आहेत ते त्यांना अजिबात दिसले नाहीत, याची जाणीव उत्पन्न होऊन, मानवी टीका किती वरवरची असते हे ध्यानांत आले व हंसूं आलें. पण अगदीं खरी, प्रामाणिक व मोकळेपणाची इत्थंभूत व काहींएक लपवालपवी न केलेली हकिकत देण्याची वेळ अद्यापि आलेली आहे, असे वाटत नाहीं आणि ती देण्याचें धैर्य किंवा प्रामाणिकपणा माझ्यामध्यें नाहीं. लौलिक व सापेक्ष सत्याच्या दृष्टीनेंच बहुतेक लोक लिहितात व त्या दृष्टीनेंच पुढील विचार लोकांपुढे ठेवलेले आहेत. टीका माझ्या जीवनक्रमावर व लेखनसंसारावर-अशा दोन विषयांसंबंधीं झाली व होते. पैकीं जीवनक्रमावरची टीका अत्यंत सहानुभूतीची व उदार बुद्धीची असते. इतकी कीं मला लोक जसें समजतात तसा मी असतो तर किती चांगलें झालें असतें असें वाटतें. लोक मला पुष्कळ वेळां जो मान देतात तो पाहून माझी मलाच लाज वाटते. असो. एका गोष्टीबद्दल मात्र तक्रार करावीशी वाटते. ती अशी कीं, कोणत्याहि विषयाच्या सर्व बाजूंचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची व असा विचार करावयास लावण्याची